पालकमंत्रीपदाचा वाद अद्याप सुटलेला नसतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलावली. ऑनलाईन ही बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला मंत्री भरत गोगावले यांच्यासह शिवसेनेच्या एकाही आमदाराने हजेरी लावली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं म्हणून शिवसेनेने हट्ट धरला आहे. हा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्याचं आपण आधीच कळवलं होतं, असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधत बैठकीला उपस्थित न राहण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. मी मिटिंगला नव्हतो. कारण रायगडावर भिडे गुरुजींचे धारकरी आले होते. माझ्याच मतदारसंघात उंबरटपासून रायगडपर्यंत धारकरींची पाच दिवस पायी यात्रा होती. त्यामुळे या धारकरींच्या स्वागतासाठी उपस्थित राहणं आवश्यक होतं. त्यामुळे बैठकीला येणार नाही हे मी आधीच सांगितलं होतं. मुख्मयंत्र्यांनाही याबाबतची माहिती दिली होती, असं भरत गोगावले म्हणाले.
माझ्या मतदारसंघात धारकरी येणार असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही रायगडला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. ते आले नाही. काही कारणाने अजितदादांनी कालची मिटिंग आज बोलावली. रायगडावर 40 ते 50 हजार धारकरी आले होते. त्यांना सामोरे जाणं माझं कर्तव्य होतं. म्हणून मी बैठकीला गेलो नाही. पण मी त्याबाबत कळवलं होतं, असं गोगावले यांनी स्पष्ट केलं.
शिवसेनेचे इतर आमदार बैठकीला का नव्हते याची मला कल्पना नाही. काल आम्हाला मिटिंगचं निमंत्रण होतं. कालची मिटिंग रद्द झाल्याचंही कळवलं होतं आणि आज साडे नऊ वाजता मिटिंग असल्याचंही कळवलं होतं. पण मी येणार नव्हतो. मी आधीच कल्पना दिली होती, असं सांगतानाच भाजपचे तरी कोण आमदार बैठकीला होते? असा सवाल त्यांनी केला. तसेच पालकमंत्रीपदावर मी अजूनही शंभर टक्के कायम असल्याचं त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या दालनामध्ये आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन घेण्यात आली. आमच्या मतदार संघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला बोलवायला पाहिजे होत. जाणीवपूर्वक मिटिंग उपमुख्यमंत्री आणि मंत्री अशी घेण्यात आली. जिल्ह्यातील राजकारण पाहता ही बैठक घेण्यात आली. बैठकीला सर्व आमदार उपस्थित असतात. आता याबाबत आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू, असं सांगतानाच पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल, असं आमदार महेंद्र थोरवे म्हणाले.