- रिना भुतडा, करिअर समुपदेशक
दहावीनंतर योग्य शाखा निवडल्यानंतरचा पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे योग्य बोर्डाची निवड करणे. हे बोर्ड अकरावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशात आणि करिअर संधींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. बारावीनंतर कोणत्याही कोर्ससाठी पात्रता किमान ४५ (उदा. एमएचटी सीईटी परीक्षा) ते ७५ टक्के (उदा. जेईई/बीआयटीएसएटी) आवश्यक असते. नीटसाठी सर्व बोर्डांसाठी किमान ५० टक्के गुण आवश्यक आहेत. प्रवेश परीक्षेत कितीही चांगले गुण असले, परंतु बोर्डामध्ये ही किमान पात्रता न मिळाल्यास, प्रवेश नाकारला जातो.
प्रवेश परीक्षांची तयारी
अकरावी आणि बारावीसाठी योग्य बोर्डाची निवड करणे हे ‘जेईई’, ‘बीआयटीएसएटी’, ‘नीट’, ‘सीएसएटी’ आणि ‘सीयूईटी’सारख्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. सीईटीसाठी स्टेट बोर्ड योग्य मानले जाते. तसेच, राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांची तयारी करताना अनेक विद्यार्थी स्टेट बोर्ड निवडतात, कारण त्याचे कोचिंग, कॉलेज पर्याय सहज उपलब्ध आहेत.
स्टेट बोर्ड परीक्षेचा नमुना तुलनेने सोपा आहे. याशिवाय, स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम अद्ययावत केला गेला आहे आणि तो संकल्पनांची स्पष्टता देण्याच्या दृष्टीने मागे नाही. स्टेट बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असताना राज्यस्तरीय प्रवेश परीक्षेचा पर्याय ठेवणे महत्त्वाचे आहे, उदा. स्टेट बोर्ड आणि अभियांत्रिकी सीईटीचा अभ्यासक्रम सारखाच आहे.
सीबीएसई अधिक लवचिकता देते आणि ‘नीट’, ‘जेईई’ सारख्या परीक्षांसाठी प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी ओळखली जाते. सीबीएसईला प्राधान्य देण्याचे कारण त्याचा अभ्यासक्रम ‘एनसीईआरटी’शी जुळतो, जो अनेक प्रवेश परीक्षांसाठी आधारभूत असतो. तसेच, सीबीएसई अभ्यासक्रमात प्रकल्प सादरीकरणाचा भाग असतो, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना वेळ द्यावा लागतो. आर्ट्स घेणाऱ्यांसाठी नियमित महाविद्यालयाचा पर्याय निवडणे आवश्यक आहे, कारण त्यांच्यासाठी कोचिंगचे पर्याय उपलब्ध नसतात.
परीक्षा-‘२०-२०’ मॅच
कॉमर्सची तयारी करताना सीए फाउंडेशन, आयपी मॅट, ‘सीएलएटी’, ‘सीयुईटी’ या प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वअभ्यासासाठी वेळ द्यावा लागतो. ‘आयजीसीएसई’, ‘आयबी’ व्यापक अभ्यासक्रम देतो, परंतु बोर्ड परीक्षा, नियमित महाविद्यालय आणि प्रवेश परीक्षेची तयारी यामध्ये संतुलन साधणे अधिक आव्हानात्मक असू शकते.
या बोर्डातील काही विद्यार्थी पदवीसाठी परदेशात जाण्यासाठी उत्सुक असतात. विद्यार्थी राष्ट्रीय प्रवेश परीक्षांसाठी तयारी करत असल्यास कोचिंगसोबत ज्या बोर्डात तुलनेने कमी वेळ द्यायला लागेल त्याची निवड करण्यात येते. अधिक वेळ मिळावा म्हणून ‘डमी, इंटिग्रेटेड, टाय अप’ महाविद्यालचा पर्याय निवडतात. विज्ञान शाखेत महाराष्ट्रामध्ये ८० टक्के विद्यार्थी स्टेट बोर्ड निवडताना दिसतात.
परीक्षा म्हणजे ५० ओव्हरच्या क्रिकेट सामन्यासारखी आहे, ज्यात खूप लिहिणे, लक्षात ठेवणे, स्पष्टीकरण देणे, स्टेप बाय स्टेप सोडवणे इ. असते. प्रवेश परीक्षा म्हणजे २०-२० क्रिकेट सामन्यासारखी असते, जिथे ओव्हर्स कमी असतात. त्यामुळे खेळाडूंनी जलद, हुशार आणि ठाम निर्णय घेणारे असावे लागते. दोन्हीही सामने महत्त्वाचे आहेत.