आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला आता मोजून 1 आठवडा राहिला आहे. या स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. त्याआधी अनेक संघांमध्ये बदल करण्यात आले आहेत. दुखापतीमुळे अनेक खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडावं लागलं. त्या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी दुसऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. बीसीसीआय निवड समिती आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुधारित संघ जाहीर करण्यात आला. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. त्यामुळे बुमराहच्या जागी हर्षित राणा याला मुख्य संघात स्थान मिळालं आहे. तर दुसऱ्या बाजूला एका गोलंदाजाने दुखापतीमुळे नाही, तर वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाची डोकेदखी आधीपासून तशीही वाढली होती. कर्णधार पॅट कमिन्स याच्यासह एकूण 4 खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार नसल्याचं निश्चित होतं. पॅट कमिन्स, मिचेल मार्श आणि जोश हेझलवूड हे तिघेही दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर झाले होते. तर मार्कस स्टोयनिस याने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड होऊनही वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे कांगारु अडचणीत सापडले. मात्र त्यानंतर स्टार्कने संघाची डोकेदुखी कमी करण्याऐवजी त्यात आणखी भर घातली. स्टार्क या स्पर्धेत वैयक्तिक कारणामुळे खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं.
दरम्यान पॅट कमिन्स याला दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळता येणार नाही. त्यामुळे स्टीव्हन स्मिथ हा चॅम्पियन्स ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. स्टीव्हनने नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यातील कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला आपल्या कॅप्टन्सीत विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर 2 मॅचच्या टेस्ट सीरिजमध्ये 2-0 अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवला. त्यानंतर आता स्टीव्हन चॅम्पियन्स ट्रॉफीत नेतृत्व करताना दिसणार आहे.
स्टार्कची चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 2025 ऑस्ट्रेलिया टीम : स्टीव्हन स्मिथ (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी, बेन ड्वार्शिस, नॅथन एलिस, जेक फ्रेजर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉनसन, मार्नस लबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट आणि एडम झाम्पा.