राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचं निधन झालं. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांना ब्रेन हॅमरेजमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लखनऊ पीजीआयमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य प्रदीप दास यांनी सत्येंद्र दास यांच्या निधनाची माहिती दिली. प्रदीप दास यांनी सांगितलं की, प्रदीर्घ आजाराने लखनऊच्या पीजीआयमध्ये सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सत्येंद्र दास यांचं निधन झालं. त्यांचे पार्थिव शरीर पीजीआयमधून अयोध्येत आणलं जाणार आहे. त्यांच्या पार्थिवाला घेऊन शिष्य अयोध्येच्या दिशेने येत आहेत. तर अंत्यसंस्कार १३ फेब्रुवारीला अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर होणार आहेत.
अयोध्येत १९९२ मध्ये जेव्हा वादग्रस्त जमिनीमुळे राम जन्मभूमीची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे गेली तेव्हा जुने पुजारी महंत लालदास यांना हटवण्याची चर्चा सुरू झाली. या दरम्यान, १ मार्च १९९२ रोजी भाजप खासदार विनय कटियार, विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि तत्कालीन प्रमुख अशोक सिंघल यांनी सत्येंद्र दास यांची नियुक्ती प्रमुख पुजारी म्हणून केली होती.