पांगरी : येडशी अभयारण्यात गेल्या दोन महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या वाघाला पकडण्यासाठी वनविभाग आणि रेस्क्यू पथकाने रविवारी (ता. ९) रात्री मोठा प्रयत्न केला. वाघाला बेशुद्ध करण्यासाठी बंदुकीच्या साह्याने इंजेक्शन मारण्यात आले. मात्र तो न बेशुद्ध होता जंगलात पसार झाला. त्यामुळे गेले दोन दिवस (सोमवार व मंगळवार) वाघाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असूनही त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याने वनविभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
दोन महिन्यांपासून वनविभागाच्या वतीने वाघाला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.रविवारी रात्री वाघ रेस्क्यू पथकाच्या टप्प्यात आला होता, त्यानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याला बेशुद्ध करण्याची योजना आखली. वरिष्ठ अधिकारी स्वतः रात्री उशिरापर्यंत येडशी परिसरात ठाण मांडून होते.वाघाला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी पिंजराही तयार ठेवण्यात आला होता. सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर योग्य अंतरावरून बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन मारण्यात आले.
मात्र, अपेक्षेप्रमाणे वाघ बेशुद्ध न होता जंगलात पसार झाला. त्यानंतर सोमवारी (ता. १०)आणि मंगळवारी (ता.११) वाघाला शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र अद्याप तो आढळून आलेला नाही. दरम्यान, हा वाघ येडशी अभयारण्यात गुरुकुल परिसरात वावरत असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तसेच त्याने काही वन्यप्राण्यांवर हल्ला केल्याचेही समोर आले आहे. सध्या वाघाचा धोका कायम असला तरी पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. अथक प्रयत्नांनंतर वाघाला पकडण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने आता पुन्हा नव्या जोमाने शोधमोहीम राबवावी लागणार आहे.