Latur School News : बोगस शाळेवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. अंबाजोगाई रोडवर नारायण E Techno शाळा मागील एक वर्षांपासून मान्यता नसताना सुरू होती. वारंवार नोटीस पाठवली, पण फरक पडला नाही. त्यामुळे दंड ठोठावत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेकडून शाळा बंद करण्यात आली, पण शेकडो विद्यार्थ्यांचं काय असा प्रश्न उपस्थित झालाय.
नारायण E Techno शाळेला जिल्हा परिषदेकडून तब्बल 19 लाख ९० हजार रूपयांचा दंड ठोकत कुलूप ठोकण्यात आलेय. मागच्या 1 वर्षापासून विना मान्यतेची शाळा सुरू होती. नारायणा ई-टेक्नो स्कूल शाळेला आता कुलूप ठोकण्यात आलेय. शाळा बंद ठेवण्याचे आदेश असतानाही वर्षभरापासून शाळा राजरोसपणे खुलेआम सुरू होती. आता कारवाई करण्यात आली.
बोगस अनाधिकृत शाळांवर शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारलाय, मात्र लातूर जिल्ह्यातील 2 इंग्रजी माध्यमांच्या अनधिकृत शाळा सुरू आहेत. या बोगस शाळांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नोटीस देत तब्बल २० लाखाचा दंड देखील ठोठावला आहे. मात्र शहरातील नारायणा ई - टेक्नो स्कूल ही अनधिकृत शाळा मागच्या एक वर्षापासून खुलेआम सुरू आहे. शाळा बंद करण्याचे आदेश देऊनही शिक्षण विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत ही, शाळा खुलेआम सुरू आहे.
खासगी इंग्रजी माध्यमाच्या या शाळेत जवळपास 350 विद्यार्थ्यांचं अनधिकृतपणे अॅडमिशन करून घेण्यात आले आहे. तर मागच्या 1 वर्षापासून ही शाळा शासनाच्या कुठल्याही मान्यतेशिवाय सुरू आहे. त्यामुळे शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमध्ये अशा बोगस शाळेवरती कारवाई करून देखील शाळा बंद केल्या जात नाहीत. त्यामुळे या बोगस शैक्षणिक संस्थांना नेमका कुणाचा वरदहस्त आहे, अशी चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे.