Solapur Airlines : विमानसेवा देण्यासाठी दोन कंपन्या इच्छुक; सोलापूर-पुणे, सोलापूर-मुंबई मार्गाच्या निविदांसाठी प्रतिसाद
esakal February 12, 2025 04:45 PM

सोलापूर : सोलापूर-पुणे व सोलापूर मुंबई यामार्गावर विमानसेवा देण्यासाठी दोन कंपन्या इच्छुक आहेत. सोलापूरहून पुणे आणि मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने निविदा मागवल्या होत्या. यामध्ये दोन कंपन्यांनी सहभाग नोंदविला असून २१ फेब्रुवारीनंतर निविदा उघडल्या जाणार असल्याची माहिती एमएडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) याबाबत मंगळवारी मुंबईत बैठक घेतली. या बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली. सोलापूरहून मुंबई व पुणे दरम्यान विमानसेवा देण्यासाठी ३१ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता निविधा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. २१ फेब्रवारीपर्यंत निविदा भरण्याची शेवटीच मुदत आहे. त्यानंतर निविदा उघडल्यानंतरच कोणती कंपनी या मार्गावर विमानसेवा देणार हे निश्चित होणार आहे.

महराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने इच्छुक विमान कंपन्याची टेंडरप्रक्रियापूर्व बैठक घेतली. यामध्ये दोन कंपन्यांनी सोलापूर ते पुणे व सोलापूर ते मुंबई या मार्गावार विमानसेवा देण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती एमएडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.

त्या कंपनीला मिळणार संधी

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीही विमान कंपन्यांना व्हिजीएफ (व्हायबिलिटी गॅप फंडिग) देण्याचे काम करते. ज्या विमान कंपनीची सेवा क्षेत्रात विश्वासर्हता चांगली आहे. सुरक्षित व सौजन्यशील सेवा देणाऱ्या व कमीत कमी अपघात झालेले आहेत. अशा कंपनीची निवड केली जाते. यासाठी ही निविधा प्रक्रिया राबविण्यात येत असून सर्वाधिक स्वस्त सेवा देऊ शकणाऱ्या चांगल्या कंपनीची यासाठी निवड केली जाते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.