- ईश्वर खामकर
किल्लेधारूर - धारूर तालुक्यातील जायभायवाडी- पिंपरवाडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणारा आईचा तांडा येथील ऊस तोडणी करणारे कुटुंबातील परमेश्वर फुलचंद आडे एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन महसूल सहायक पदी निवड झाली असल्याने धारूर तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदन करून कौतुक होत आहे.
तालुक्याचा बहुतांश भाग डोंगराळ असल्याने या ठिकाणी शैक्षणिक सुविधा अत्यल्प प्रमाणत आहेत. मात्र, याला न जुमानता येथील युवक अभ्यासाच्या जोरावर अधिकारी होऊ पाहत आहेत. तालुक्यातील जायभायवाडी -पिंपरवाडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आईचा तांडा येथील फुलचंद आडे हे पत्नी व आपल्या ज्ञानेश्वर व परमेश्वर या दोन मुलासह ऊस तोडणी करून कुटुंबाचा गाडा हाकत, त्यांनी आपला लहान मुलगा परमेश्वर आडेला धारूर तालुक्यात बारावीपर्यंत शिक्षण दिले.
त्याने राजमाता जिजाऊ महाविद्यालयात अकरावी तर बारावी गाजपुर येथे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण घेण्याची परिस्थिती नसल्याने ऊस तोडणी करत राजमाता जिजाऊ महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठामध्ये पदवीधर शिक्षण घेतले.
आई -वडिल व भाहु ज्ञानेश्वर वहिनी व पत्नी रुक्मिणी यांनी पुढे शिक्षणाचा हट्ट करत शासकीय नोकरी मिळावी यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले. विशेष बाब माझ्यासोबत माझी पत्नी ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याचे फुलचंद आडे यांनी सांगितले.
आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही ठरवत स्पर्धा परीक्षेची तयारीला सुरुवात केली. नाते संबंधातील सासरे शेकू राठोड (महाराज) यांनीही आर्थिक बळ दिले. स्पर्धा परीक्षेला सुरुवात करत अनेक स्पर्धा परीक्षा पास होत गेलो. पण मुख्य परीक्षेच्या वेळेस एक दोन गुणांनी मागे राहत यश गाठण्यात अपयश येत होते.
शेवटी जिद्द मेहनत घेत एमपीएससी अंतर्गत घेतलेल्या परीक्षेचा निकाल हाती आला. त्यामध्ये महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याने परमेश्वर आडे याचे सर्व स्तरातून अभिनंदन करून कौतुक करत आहेत. या यशाबद्दल गावातील डॉ. सुंदर जायभाय सह पिंपरवडा गावचे सरपंच, ग्रामस्थ, धारूर येथील व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना तसेच धारूर तालुक्यातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे.