बेस्ट थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय
धारावी नागरिक समितीच्या पाठपुराव्यानंतरही दुर्लक्ष
धारावी, ता. १३ (बातमीदार) : धारावी काळा किल्ला डेपोतून निघणाऱ्या ९० फूट मार्गे, सायन मार्गे जाणाऱ्या बसगाड्यांना ९० फूट मार्गावरील सर्व बस थांब्यांवर सेवा मिळावी, यासाठी धारावी नागरिक समितीतर्फे प्रयत्न केले जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या मागणीचा पाठपुरावा समितीचे कार्यकर्ते करत आहेत.
बस थांब्याचे मागणीपत्र धारावी नागरिक समिती शिष्टमंडळाद्वारे ६ जानेवारी रोजी काळा किल्ला डेपो व्यवस्थापक यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले होते. त्यानंतर अनेकदा पत्राची आठवण करून देण्यात आली, मात्र अद्यापही कोणतीही कार्यवाही झाल्यामुळे सोमवारी (ता. १०) स्मरणपत्र देण्यात आले आहे. तसेच काळा किल्ला डेपो मार्गातून सर्व मार्गांवर जाणाऱ्या बससेवांची माहिती, क्रमांक, मार्ग आणि वेळ कळवण्यात यावी, अशीही विनंती या पत्रातून करण्यात आली आहे अन्यथा संघटित व कायदेशीर मार्गाने न्याय मिळवावा लागेल, असा इशारा धारावी नागरिक समितीचे दिलीप गाडेकर, गिरीराज शेरखाने व शंकर खिल्लारे यांनी दिला आहे.
आगारप्रमुखांना जाब विचारणार
बेस्ट प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याची माहिती धारावी नागरिक समितीने दिली. त्यामुळे लवकरच धारावी नागरिक समितीचे शिष्टमंडळ व धारावीकर आगारप्रमुख यांची भेट घेऊन जाब विचारणार आहेत. समितीच्या मागणीचा बेस्ट प्रशासनाने विचार करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.