मुंबई - 'शरद पवार यांची राजकीय व सामाजिक उंची अतुलनीय आहे. त्यामुळे, प्रामाणिकपणाने सांगतो शब्द जरा जपून वापरा. हे विश्वासघातकी वगैरे आम्ही ऐकून घेणार नाही. त्यांनी असे काय केले आहे?
पण जेव्हा लढायची वेळ येईल, त्यावेळी तुमच्यापेक्षा जास्त जास्त आक्रमक शरद पवार असतील,’ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले.
नवी दिल्ली येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला. या सत्कारवेळी पवार यांनी शिंदे यांची केलेली स्तुती जिव्हारी लागल्याने राऊत यांनी टीकेची झोड उठवली आहे. त्याला आज आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
ते म्हणाले, की राजकारणातील कटुता संपविण्यासाठी संवादाचे पूल बांधणे गरजेचे आहे. त्यामुळे शरद पवार यांनी कोणाला भेटावे आणि कोणाला भेटू नये, याचा सल्ला कोणी द्यायची गरज नाही. ज्यांनी काल शरद पवार यांच्यावर टीका केली त्यांनाही माहिती आहे की बाळासाहेबांचीही शरद पवार यांच्याशी मैत्री होती. त्यांची राजकीय आणि सामाजिक उंची पाहून त्यांना साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे.
शरद पवारांकडून शिकावे
आव्हाड म्हणाले, की शरद पवार यांचे राजकारणातील स्थान, त्यांच्या विचारांची उंची मोठी आहे. ते देशातील असे राजकारणी आहेत, की त्यांच्या मनात सूड, द्वेष कधीच निर्माण होत नाही. त्यामुळे ते असे का करतात, असा राग आम्हालाही कधी कधी येतो. पण ते हे करतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.
ज्यांनी राजकारणात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पक्ष, निशाणी पळवली, अशा लोकांबरोबरही एकाच व्यासपीठावर येऊनही पवार यांनी चिडचिड किंवा द्वेष केला नाही. राज्यातील राजकारण्यांनी शरद पवार यांच्याकडून हे शिकावे, असा सल्लाही त्यांनी दिला.