पुणे - पुणे आणि पिंपरी -चिंचवड शहरातील विविध भागात ५१ घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. मागील काही दिवसांत केलेल्या १३ घरफोड्या पोलिसांनी उघडकीस आणल्या असून, त्याच्या ताब्यातून २३६ ग्रॅम सोन्याचे दागिने, २१२ ग्रॅम चांदी आणि घरफोडीचे साहित्य असा सुमारे १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हर्षद गुलाब पवार (वय ३१, रा. गुलाबनगर, घोटावडेफाटा, ता. मुळशी) असे चोरट्याचे नाव आहे. या संदर्भात पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अजित बडे आणि पोलिस हवालदार सचिन जाधव यांना शिवाजीनगरमधील म्हसोबा गेट बस थांब्यावर घरफोडीच्या गुन्ह्यातील एक संशयित आल्याची माहिती मिळाली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या पिशवीची झडती घेतली असता सोन्या-चांदीचे दागिने आणि घरफोडीचे साहित्य आढळून आले. चौकशीदरम्यान त्याने शहराच्या विविध भागात १३ घरफोड्या केल्याचे उघडकीस आले. त्यात शिवाजीनगर, वारजे माळवाडीत प्रत्येकी तीन, खडक, विमानतळ परिसरात प्रत्येकी २, चंदननगर, बावधन, आळंदी परिसरात प्रत्येकी एक यांचा समावेश आहे.
वेशभूषा बदलून घरफोड्या -
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात हर्षद पवार याच्यावर २०२३ पूर्वी ५१ हून अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात त्याला २०२३ मध्ये जामीन मिळाला. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा घरफोडी सुरू केली. घरफोडी करण्यापूर्वी तो परिसरात रेकी करून सीसीटीव्हीमध्ये दिसणार नाही, याची खबरदारी घेत होता.
स्वत:ची ओळख लपविण्यासाठी वेगवेगळे जॅकेट, टोपी परिधान करून वेशभूषा बदलत असे. चोरीचे दागिने विकण्यासाठी सहआरोपी निळकंठ राऊत याची मदत घेत होता. हर्षदकडून घरफोडीचे साहित्य आणि कुलुपांच्या ४९ चाव्या आढळून आल्या. हर्षद पवार हा सुटीचा दिवस सोडून दिवसा घरफोडी करीत होता. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त गिल यांनी सांगितले.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहाय्यक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलिस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत सूर्यवंशी, सहाय्यक निरीक्षक संजय पांढरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.