- रिना भुतडा, करिअर समुपदेशक
अकरावीसाठी विज्ञान ही लोकप्रिय शाखा आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, संशोधन आणि तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रातील विविध करिअर संधी याद्वारे उपलब्ध होते. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित यांचा समावेश असतो. त्यामुळे भविष्यातील विशेष अभ्यासासाठी पात्रता व भक्कम पाया घातला जातो.
विज्ञानात उत्कृष्टता मिळवण्यासाठी
विद्यार्थ्याकडे सर्वसामान्य आकलन क्षमता, तर्क विचार क्षमता, अंकज्ञान, तात्त्विक वैचारिक कल आदी क्षमता असणे आवश्यक आहे. याची ओळख कलचाचणीद्वारे होऊ शकते. स्वअभ्यासाची सवय, उजळणी, कोचिंग, सराव चाचण्यांसह संतुलित दिनक्रम यश सुनिश्चित करतो.
करिअरच्या संधी
बारावीनंतर ‘पीसीएम’ घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी (जेईई, सीईटी, बिट्सॅट इ.), आर्किटेक्चर (जेईई पेपर २, नाटा), प्युअर सायन्स व कृषी क्षेत्र उपलब्ध आहे. तर ‘पीसीबी’ घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी नीट आणि सीईटीद्वारे वैद्यक, फार्मसी, प्युअर सायन्स यासारखे पर्याय खुले आहेत.
संशोधनाच्या संधींमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणितातील बीएस्सी अभ्यासक्रमांचा समावेश होतो, ज्यासाठी ‘आयआयएसईआर’(IAT द्वारे) आणि ‘एनआयएसईआर’ (NEST द्वारे) सारखी नामांकित संस्था उपलब्ध आहेत. ‘एनडीए’द्वारे भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलासाठी पीसीएम आवश्यक आहे. तसेच डेटा सायन्स, आयटी, फॉरेन्सिक सायन्स आणि एव्हिएशन यासारख्या क्षेत्रांमध्ये विशिष्ट पात्रता निकष आणि बहुतांश प्रवेश परीक्षांची आवश्यकता विज्ञान असते. मात्र, या व्यतिरिक्तच्या कोर्सेससाठी विज्ञान शाखा घेण्याची आवश्यकता नाही.
अनेक विद्यार्थ्यांना दहावीत विज्ञान विषयात चांगले गुण मिळतात आणि ते स्वतःच्या क्षमता किंवा आवश्यक समर्पण न तपासता विज्ञान निवडतात. उदा. एखादा विद्यार्थी जीवशास्त्रात १०० गुण मिळवून ‘पीसीबी’ निवडतो आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहतो. मात्र, नंतर त्या क्षेत्रातील कठोर मागण्या लक्षात आल्यावर तो आपल्या प्रवृत्ती आणि आवडींना अधिक अनुरूप असलेल्या दुसऱ्या प्रवाहाकडे वळतो.
त्याचप्रमाणे, काही विद्यार्थी केवळ उच्च गुणांमुळे विज्ञान निवडतात, परंतु तर्कशक्ती आणि संख्यात्मक क्षमतांच्या अभावामुळे भौतिकशास्त्र आणि गणितासारख्या विषयांशी जुळवून घेण्यात त्यांना अडचणी येतात. त्यामुळे विज्ञान शाखा निवडण्यापूर्वी कल व क्षमता तपासून घेणे आवश्यक आहे.
विज्ञानातील प्रवेश क्षमता
यावर्षी राज्यात सुमारे ७.७ लाख विद्यार्थी बारावी विज्ञानाची परीक्षा देत आहेत, त्यापैकी फक्त ४.५ लाख विद्यार्थ्यांनाच अभियांत्रिकी, वैद्यक, फार्मसी, आर्किटेक्चर, बीएस्सी व कृषी इ. क्षेत्रात प्रवेश मिळेल. उर्वरित विज्ञानातील विद्यार्थी जातात तरी कुठे? उर्वरित विद्यार्थी बहुधा योग्य कोर्स, शाखा, महाविद्यालयामध्ये प्रवेश न मिळाल्याने विज्ञान प्रवाह सोडतात, तोपर्यंत पालकांचे किमान २ ते ४ लाख रुपये कोचिंगसाठी खर्च झालेले असतात.
विज्ञान निवडल्यास कोणतेही करिअर सहज साध्य होते, या एका गैरसमजातून हा खर्च होतो व नंतर मार्ग (वाणिज्य किंवा कला शाखा) बदलावा लागतो. त्यामुळे विज्ञान शाखेची निवड करण्यापूर्वी प्रवेश परीक्षा कोणती देणार? त्यातील स्पर्धा किती व कोणाशी? व प्लॅन बी काय असेल? किती कष्ट घ्यावे लागतील? या सर्वांचा सखोल विचार विज्ञान शाखेत यश संपादन करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.