मुंबई : राजधानी मुंबईतील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी बेकरीत लाकडी आणि कोळसा भट्टी वापरण्यास मुंबई (Mumbai) महापालिका क्षेत्रात बंदी घातल्याने ही बंदी मागे घेण्याची मागणी बेकरी मालकआणि भाजप माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मागणी केली आहे. यावर पर्याय निघाला नाही तर मुंबईत (BMC) वडापावसाठी लागणाऱ्या पावाचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता बेकरी असोसिएशनने वर्तवली आहे. मुंबईतील बेकरी आणि इराणी कॅफे यांना नियमातून वगळावे व पाककलेचा वारसा जपण्यासाठी वारसा दर्जा द्यावा, अशी मागणी माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. लाकूड आणि कोळसा भट्टी बेकरीतून बंद करून खरच प्रदूषण कमी होणार का? लाकडी आणि कोळसा पट्टी बंद झाल्याने नेमका काय परिणाम व्यवसायावर होणार? लाकडी आणि कोळसा भट्टीला इलेक्ट्रिक आणि एलपीजी पीएनजी गॅसचा पर्याय योग्य आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, मुंबईकरांना पाव कुठून मिळेल, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईतील वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आवश्यक ती सर्व पाऊले मुंबई महापालिका उचलत आहे. त्यात न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेने बेकरी प्रॉडक्ट बनवताना होणाऱ्या लाकडाच्या आणि कोळसा भट्टीच्या वापरावर बंदी घातली असल्याने अनेक ठिकाणी बेकरी त्यासोबतच इराणी कॅफेला नोटीस पाठवून कारवाई करण्यात येत आहे. याच कारवाईला बेकरी असोसिएशनने विरोध दर्शवला असून इराणी कॅफे आणि जुन्या बेकरींना वारसा दर्जा द्यावा, अशी मागणी देखील भाजप माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली आहे.
मुंबईत मागील पाच दशकांपेक्षा तर काही बेकरी या 100 वर्ष जुन्या आहेत, ज्या पाव व इतर बेकरी प्रॉडक्ट बनवण्यासाठी लाकडाच्या कोळशाच्या भट्टीचा वापर करतात. मुंबईभर सर्व बेकरी प्रॉडक्ट्सचे उत्पादन करुन पुरवठा करतात. त्यावरच अनेक बेकरीचे दुकान, वडापाव स्टॉल्स, हॉटेल्स रेस्टॉरंट अवलंबून आहेत. मात्र, बीएमसीने या कोळसा आणि लाकडी भट्ट्यांऐवजी इलेक्ट्रिक किंवा गॅसवर चालणाऱ्या भट्ट्यांचा वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, यावर अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असल्याचं बेकरी असोसिएशनच म्हणणं आहे. बॉम्बे बेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष नासिर अन्सारी यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
इंडिया बेकर्स असोसिएशन्स नेमकं म्हणणं काय आहे?
मुंबई महापालिकेच्या निर्देशानुसार लाकडी भट्टी बंद करून इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही. याशिवाय या इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करून मोठ्या प्रमाणावर पाव इतर बेकरी प्रॉडक्ट तयार करणे शक्य होणार नाही, असे इंडिया बेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष खोदादाद इराणी यांनी म्हटलं आहे. तसेच, मुंबई महापालिकेने दुसरा पर्याय दिला आहे तो एलपीजी गॅस सिलेंडरचा. किमान दहा एलपीजी सिलेंडरचा वापर हा बेकरी साठी रोज होईल, सिलेंडरचा वापर बेकरी प्रॉडक्ट तयार करण्यासाठी झाल्यास जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, कारण अनेक बेकरी या रहिवासी भागात आहेत, असेही इराणी यांनी म्हटलं आहे.
पीएनजी गॅसचा वापर बेकरीमध्ये करण्यात आला तर पीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅसकडे अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. याशिवाय जागेचा वापर बेकरीमध्ये करण्यास परवानगीला अनेक अडथळे येत असल्याचे समोर आले आहे. मुंबईत सर्वत्र पीएनजी गॅस पुरवठा करणे शक्य होत नाहीये लाकडी भट्टीचा वापर थांबवून इलेक्ट्रिक किंवा एलपीजी पीएनजी गॅसचा वापर करायचा झाल्यास उपकरणे बसवण्यासाठी किमान एक महिना बेकरी मालकांना लागेल. कमीत कमी दहा ते पंधरा लाख रुपये खर्च येईल, त्यासाठी राज्य सरकारने अर्थसहाय्य करावे, अशी मागणी सुद्धा बेकरी असोसिएनशकडून करण्यात आली आहे.
जागरुकता करणे गरजेचे
लाकडी भट्ट्यांचा वापर बंद करून जर इलेक्ट्रिक किंवा गॅसच्या भट्ट्या वापरल्या तर काय नफा तोटा होतो हे सुद्धा आम्ही समजून घेतलं. काही नवीन बेकरी आहेत ज्या लाकडी भट्ट्यांचा वापर करत नाहीत. मात्र, यशस्वीरित्या व्यवसाय करतात अशी सुद्धा उदाहरण आहेत. मात्र या सगळ्याची समजूत किंवा याबद्दल जागरूकता निर्माण करणे सुद्धा महत्त्वाचा आहे, असे उद्योजक आणि लेखक प्रफुल्ल वानखेडे यांनी म्हटलं आहे.
महापालिकेनं विचार करावा
दरम्यान, याच बेकरी प्रॉडक्टसवर लाखो लोकांचे पोट अवलंबून आहे. शिवाय आपलं पोट भरण्यासाठी लागणाऱ्या वड्याला पावसुद्धा याच लाकडी भट्टीतील बेकरीतून येतो. गल्लोगल्ली झालेल्या वडापाव स्टॉलला सुद्धा पावाचा पुरवठा याच बेकरीतून होतो. त्यामुळे ज्यांचं पोट या व्यवसायावर अवलंबून आहे, त्यांच्याशी चर्चा करणं त्यांना समजून सांगणं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना निर्बंध लावणे, आधी काहीसा वेळ देणे हे आवश्यक आहे. या सगळ्यांचा विचार मुंबई महापालिका निर्बंध लावताना आणि सबंधितांवर कडक कारवाई करताना करेल ही अपेक्षा आहे.
<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/news/politics/minister-gharat-gogawale-attacked-on- raj-mla-raj-molol-in- iSn-t-it-patilki-Shivaji-maharaj-had- पॅटिल -1345299 मेड-पुनेशमेंट ऑफ-ऑफ-ऑफ-ऑफ-ऑफ-ऑफ-ऑफ-ऑफ-ऑफ-ऑफ-पेनिशनमेंट">पाटीलकी ना? शिवाजी महाराजांनी पाटलांचे चौरंग केले होते; मंत्री भरत गोगावलेंचा माजी आमदारावर हल्लाबोल