आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने विजयी सुरुवात केली आहे. मोहम्मद शमी याने घेतलेल्या 5 विकेट्स आणि शुबमन गिल याने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर भारतीय संघाने बांगलादेशवर एकतर्फी विजय मिळवला. बांगलादेशने भारताला विजयासाठी 229 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 21 बॉलआधी पूर्ण केलं. भारताने 46.3 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 231 धावा केल्या. टीम इंडियाचा आता या स्पर्धेतील पुढील सामना हा 23 फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
बांगलादेशविरुद्धच्या शानदार विजयानंतर रोहित शर्माला पाकिस्तानविरुद्धच्या आगामी सामन्याबाबत आणि खेळपट्टीबाबत प्रश्न केले. यावरुन रोहितने काय उत्तर दिलं, जाणून घेऊयात. “बघा मी त्या सामन्याच्या खेळपट्टीबाबत आतापासूनच काही बोलू शकत नाही. मी हे सर्व सांगायला मी काय क्युरेटर तर नाही. इथे अनेक सामने झाले आहेत. आम्ही 23 तारखेला येऊन खेळपट्टी कशी असेल हे पाहू”, असं रोहितने म्हटलं.
दरम्यान बांगलादेशविरुद्ध मोहम्मद शमी याने 5 विकेट्स घेतल्या. शमीमुळे बांगलादेशला 230 पार मजल मारता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 228 धावांवर रोखलं. त्यानंतर टीम इंडियाचा सलामीवीर आणि उपकर्णधार शुबमन गिल याने चॅम्पियन्स ट्रॉफीतील पदार्पणाच्या सामन्यात धमाका केला. शुबमनने नाबाद 101 धावांची खेळी केली. शुबमन भारताला जिंकून नाबाद परतला. आता रविवारी टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध भिडणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. हा सामनाही दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचा हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित करण्याचा प्रयत्न असेल.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तान क्रिकेट टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), बाबर आझम, कामरान गुलाम, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, उस्मान खान आणि सौद शकील.