डॉ. मालविका तांबे
झोप ही निसर्गाकडून मिळालेली देणगी आहे. जोपर्यंत झोप व्यवस्थित व शांत व लागते तोपर्यंत तिची किंमत केली जात नाही. रात्र झाली, दमणूक झाली, मस्त पोटभर जेवण झाले की आपण छान गादीवर जाऊन पडतो व झोपतो, झोप पूर्ण झाली की उठतो. पण हीच झोप इच्छा असेल तेव्हा येत नसली, आली तरी अशांत असली तर तिचे महत्त्व लक्षात यायला लागते.
आयुर्वेदात झोपेला एवढे महत्त्व दिलेले आहे की आरोग्याच्या तीन मुख्य आधारांपैकी झोप एक आहे असे सांगितलेले आहे. आरोग्य सांभाळण्यासाठी आहारासारखीच तिची काळजी घेतली पाहिजे असे सांगितलेले आहे. त्यामुळे झोप काय असते कशी येते, तिचे आरोग्यासाठी काय फायदे असतात, झोपण्याचे काय नियम असतात, हे एकदा शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेतले तर जास्त उत्तम होईल. आचार्य चरकांच्या मतानुसार निद्रा ही एक अशी अवस्था आहे जेथे मन संपूर्णपणे इंद्रियांपासून वेगळे झालेले असते. आचार्य वाग्भटांच्या मतानुसार जेव्हा कफ व तमोदोष आपल्या सर्व स्रोतसांना आवृत्त करतात किंवा आपली इंद्रिये दमून गेलेली असतात, तेव्हा निद्रा येते.
श्र्लेष्मावृतेषु स्रोतसुः श्रमादुपरतेषु च।
इन्द्रियेषु स्वकर्मेभ्यो निद्राऽविशति देहिनाम्।।
...अष्टांगसंग्रह
निद्रा ही अधारणीय वेग आहे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. झोप आली की झोपणे हे आरोग्यासाठी उत्तम असते. झोप टाळली गेली तर त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होताना दिसतात. आजच्या आधुनिक पिढीच्या दिनचर्येचा विचार केला तर झोप आली की झोपणे क्वचितच कोणाला जमते. लहान मुलांना अभ्यास असतो, मोठ्यांना नोकरी, व्यवसाय यांचा समन्वय साधायचा असतो, घरातील चिमुकली मंडळी रात्री त्यांचे आजीआजोबा, आईवडील टीव्ही बघत असल्याने सातऐवजी रात्री एकला झोपतात असे दिसते. रात्री उशिरापर्यंत सोशल साईटस् वर राहणे, चॅट करणे, टीव्ही वा मोबाईल वर सिरियल वा सिनेमा बघणे हे सध्याच्या काळातील रिलॅक्सेशनचा प्रकार झालेले आहेत. वेळेत झोपायचा किंवा झोप आल्यावर झोपायचा सल्ला दिला, तर लोकांनी प्रतिक्रिया असते, अहो तोच तर माझा me-time असतो, त्यामुळे थोडा वेळ तरी टीव्ही वा मोबाइल बघितल्याशिवाय मला झोप येत नाही.
झोपेचे फायदे सांगत असताना आयुर्वेदात म्हटले आहे, उचित व वेळेवर मिळणारी झोप शरीराचे पोषण करते, कांती उजळवते, शरीरशक्ती वाढवते, उत्साह देते, अग्रीचे दीपन करते, डोळ्यांवर झापड येऊ देत नाही, शरीरातील धातू संतुलित राहायला मदत करते. याऐवजी निद्रा व्यवस्थित झाली नाही तर सुखाऐवजी दुःख येते, शरीराची पुष्टी होण्याऐवजी शरीराचे क्षरण होते, शरीराला बल मिळण्याऐवजी शक्ती कमी होते, शुक्र वाढण्याऐवजी क्लीबता येते, ज्ञानाऐवजी अज्ञान आणते. त्यामुळे अकाळी व व्यवस्थित मात्रेत निद्रा न झाल्यास सुखी आयुष्याऐवजी कालरात्र होते असे सांगितले आहे.
निद्रायतं सुखं दुःखं पुष्टिः कार्श्यं बलाबलम्।
वृषता क्लीबता ज्ञानमज्ञानं जीवितं न च।।
अकाले अतिप्रसंगश्र्च न च निद्रा निषेविता।
सुखायुषी परा कुर्यात् कालरात्रिः इवापरा।।
त्यामुळे झोपेच्या बाबतीत काही नियम पाळणे आवश्यक असते हे प्रथम समजून घेतले पाहिजे.
१. ब्राह्ममुहूर्ताला उठणे हे स्वास्थ्याच्या दृष्टीने व आयुष्य चांगले जाण्यासाठी अत्यंत गरजेचे असते. ब्राह्ममुहूर्त म्हणजे साधारण सूर्योदयाच्या पाऊण तासाच्या आधीचा काळ. उन्हाळ्यात साधारणपणे पाच वाजेच्या सुमाराला व थंडीमध्ये साधारण सहा वाजेच्या सुमाराला आपण ब्राह्ममुहूर्त म्हणू शकतो.
२. कुठल्याही व्यक्तीने साधारण ६ ते ८ तास झोप घेणे हे ब्राह्ममुहूर्ताच्या आधीच्या तासांमध्ये करावे. मला ६ ते ८ तास झोप घेणे आवश्यक आहे, मी उशिरा झोपून उशिरा उठून माझी झोप पूर्ण करतो असे म्हणून चालत नाही. उशिरा झोपल्यामुळे शरीरात वात व पित्त दोषांचा व उशिरा उठल्यामुळे कफदोषाचा प्रकोप होतो. त्यामुळे उशिरा झोपणे व उशिरा उठणे या दोन्ही गोष्टी केल्यास शरीरातील तिन्ही दोष प्रकुपित होतात हे लक्षात ठेवायला हते. त्यामुळे वेळेवर झोपणे व वेळेवर उठणे हे अत्यंत महत्त्वाचे असते.
३. झोपावे कशावर? – पलंगावर झोपणे आरोग्यासाठी सगळ्यांत उत्तम असते. जमिनीवर गादी घालून झोपणे वाताचे व कफाचे शमन करते. जमिनीवर झोपणे शरीरात वात वाढवते. कुठल्याही कडक स्थानावर झोपणे हे शरीरात वात वाढविण्यास कारणीभूत ठरते. गादीवर व्यवस्थित स्वच्छ चादर घालून स्वच्छ पांघरूण घेऊन जी झोप घेतली जाते ती शरीरातील वाताचे शमन करते.
४. झोप शक्यतो डाव्या कुशीवर घेणे उत्तम असते.
५. झोपताना डोके पूर्वेकडे वा दक्षिणेकडे करणे उत्तम असते.
निद्रा व दोषांचा संबंध
झोप त्रिदोषांपैकी कफाच्या आधिपत्याखाली येते. रात्री ६ ते १० हा कफाचा काळ असतो, हा संपायच्या सुमारास झोपायला गेलेले उत्तम. काळात झोपायला जाणे उत्तम. त्यानंतरचा काळ पित्ताचा काळ असल्यामुळे झोपायला जाण्यास उशीर झाला तर झोप येणे अवघड होत जाते.
सकाळी सहा वाजेच्या आत उठले तर तो काल वाताचा असल्यामुळे उठणे सोपे जाते.
सकाळी ६ ते १० हा कफाचा काळ असल्यामुळे या काळात उठल्यास शरीरात जडपणा, आळस वाटू शकतो.
बाल्यावस्थेत कफाचे आधिक्य असल्यामुळे मुले जास्त वेळ झोपतात. जस जसे वय वाढते तसे शरीरात वात दोष वाढल्यामुळे वृद्धपणी झोप कमी होते. त्यामुळे लहान बाळासारखी झोप लागणे हे वरदान समजले जाते.
कुठल्याही वयात साधारण ६ ते ७ तास झोप होणे अत्यंत गरजेचे असते. सध्याच्या काळात लहान वयातच मुलांना झोप न लागणे, युवावस्थेत व वृद्धावस्थेत तर बरेच जण निद्रानाशाच्या त्रासाने त्रस्त असतात. खूप जास्त दुःख झाले, मन चिंताग्रस्त असले, कशाबद्दल फार चिंता मनात असली, शरीरात रूक्षता व कोरडेपणा असला, शरीरात वातदोष वाढलेला असला तर निद्रानाश होऊ शकतो. सध्याच्या काळात रात्र झाली तरी सगळीकडे मोठमोठे दिवे लावलेले असतात. यामुळेही शरीरात झोपेला नियंत्रित करणाऱ्या ग्रंथींपर्यंत चुकीचे सिग्नल जातात, पर्यायाने झोप येत नाही. त्यामुळे शांत झोप लागण्यासाठी प्रत्येकाने उपाय करणे आवश्यक आहे.
वेळेवर झोपायला जावे. गादीवर शांतपणे बसून ५-१० मिनिटे ॐकार म्हणावा, स्वतःचे मन शांत होण्यासाठी श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांचे योगनिद्रा, समृद्धी, स्पिरीट ऑफ हार्मनी वगैरे संगीत ऐकावे. यामुळे मनावर असलेला ताणतणाव कमी होऊन शांत झोप लागायला मदत मिळते.
झोपण्यापूर्वी शवासन वगैरे रिलॅक्सेशनची आसने केल्यास झोप लागायला मदत होते.
झोप शांत येण्यासाठी आयुर्वेदात सांगितलेले काही उपाय असे आहेत,
अभ्यंग – संपूर्ण शरीराला वातशामक तेलाचा अभ्यंग करावा. उदा. संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेल संपूर्ण शरीराला लावल्यावर शांत झोप यायला मदत मिळते असा अनेकांचा अनुभव आहे.
झोपण्यापूर्वी संतुलन पादाभ्यंग घृत लावून काशाच्या वाटीने तळपायांना पादाभ्यंग केल्यास शांत झोप यायला मदत होताना दिसते.
काही लोकांना रात्री पायांत पेटके येतात व त्यामुळे झोप येत नाही. अशांनाही निदान पायांना हलक्या हाताने तेल लावून झोपावे.
टाळूवर संतुलन ब्रह्मलीन सिद्ध तेलासारखे तेल नियमाने लावल्यास शांत झोप यायला मदत होते.
झोपण्यापूर्वी हळद घालून गरम दूध घेतल्यास, रात्रीच्या जेवणात तांदळाची खीर घेतल्यास किंवा दुपारच्या जेवणात शिरा घेतल्यास झोप यायला मदत करू शकते.
आयुर्वेदात अश्र्वगंधा, ब्राह्मी, जटामांसी, शंखपुष्पी वगैरे वनस्पती झोप यायला मदत करू शकतात असे सांगितलेले आहे.
काल्मो - शांत झोप न लागणे, मन शांत न राहणे, डोक्यात विचार चालू राहणे, वेगवेगळी स्वप्ने पडणे, दिवसभरात छोट्या छोट्या कारणांनी चिडचिड होणे, ताण आला की छातीत धडधडणे, रात्री गादीवर पडल्यावर ताणाचा विषय आठवत राहणे, एकूणच सतत चिडचिड-संताप होणे, नैराश्य वाटणे, वगैरे त्रास असल्यास संतुलन आयुर्वेदामध्ये तगर, अश्र्वगंधा, मोती, शंखपुष्पी आणि अन्य घटकांपासून बनविलेली काल्मो गोळी सकाळ संध्याकाळी २-२ या प्रमाणात पाण्याबरोबर घेण्याने झोप व मन हे दोन्ही शांत व्हायला मदत मिळते असा अनुभव आहे.
तसेच निद्रानाशाचा त्रास असणाऱ्यांसाठी संतुलनमध्ये पंचकर्मात शरीरशुद्धी झाल्यावर शिरोधारा, शिरोबस्ती तसेच मज्जाधातूपोषक बस्ती केल्या जातात, जेणेकरून शांत झोप यायला मदत मिळते.
झोप व्यवस्थित न झाल्यामुळे मेंदूला हवा तसा आराम न मिळाल्यास अल्झामर्स, स्मृतिनाश, नसांसंबंधित रोग, असे वेगवेगळे आजार वाढताना दिसत आहेत, त्यामुळे झोपेचे महत्त्व जाणून घेऊन तशी काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.