मुंबई : सहजासहजी उपलब्ध होत नाहीत अशी गुप्त कागदपत्रे अंजली दमानिया यांना कशी मिळतात, असा सवाल करत ती खरी आहेत की खोटी आहेत याची पोलिसांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करत राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.
दमानिया यांना गोपनीय कागदपत्रे कशी मिळतात, असा सवाल परांजपे यांनी केला आहे. त्याबरोबर या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही परांजपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ‘इफ्को’ कडून खरेदी करण्यात आलेली नॅनो युरिया,
अॅटोमॅटिक स्प्रे पंप खरेदी यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात येत आहे.
या आरोपांचा खुलासा मुंडे यांच्याकडून करण्यात आला आहे. मुंडे यांच्यावर खोटी कागदपत्रे सादर करून मान्यता घेतल्याचा आरोप अंजली दमानिया करत आहेत. त्याचाही खुलासा मुंडे यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर परांजपे म्हणाले , की कागदपत्रांवर मुख्य सचिवांची तसेच कृषी सचिवांची सही आहे. अशा प्रकारच्या कागदपत्रांचा स्रोत आणि त्याची वैधता याचा शोध लागला पाहिजे. लोकशाहीत आरोप करण्याचा अधिकार आहे. परंतु जबाबदार मंत्र्यांवर काहीतरी सनसनाटी आरोप करून खोटी कागदपत्रे, खोटी टिपणी तयार करून २०० कोटी रुपयांच्या व्यवहाराला मान्यता दिली, असा खोटा आरोप दमानिया करीत आहेत.
त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात येत असल्याचे परांजपे यांनी स्पष्ट केले.