ढिंग टांग : धक्कापुरुष, टक्कापुरुष आणि पक्कापुरुष..!
esakal February 21, 2025 11:45 AM

सदू : (अतिशय चिंताग्रस्त मनःस्थितीत फोन फिरवत) म्यांव म्यांव..!

दादू : (अतिशय खेळीमेळीच्या मूडमध्ये फोन उचलत) बोल सदूराया, असा मांजरासारखा म्यांव म्यांव का करतोस? छान गुरगुर कर की! वाघ माणसानं वाघासारखं राहावं!

सदू : (गंभीरपणे) कसला वाघ नि कसलं काय! ताटाखालचा वाघ बनून जगण्यापेक्षा ताटावरचं मांजर बनून लोणी खाल्लेलं काय वाईट?

दादू : (गोंधळून) हा नुसताच फिल्मी डायलॉग होता की टोमणा मारलास?

सदू : (कळवळून) दिवस किती फिरलेत, तुला कळत कसं नाही, दादूराया? कसाही असलास तरी माझा भाऊ आहे, म्हणून काळजीपोटी फोन केलाय!!

दादू : (चक्रावून) का? छान चाललंय की आपलं! रोज सकाळी चहा-नाश्ता, दुपारी चांगलंचुंगलं भोजन, संध्याकाळी कुठल्यातरी हाटेलात चव चाखण्याची मोहीम…बरं चाललंय? हल्ली मी तर बुवा रात्री साडेनऊलाच झोपतो!!

सदू : (सुस्कारा टाकत) लकी आहेस! अज्ञानात आनंद असतो म्हणतात!!

दादू : (किंचित रागावून) कोड्यात बोलू नकोस! माझ्यासारखा सरळ वागत बोलत जा! माझं कसं ओठात एक, पोटात दुसरंच असं काही नसतं! एक घाव दोन तुकडे!!

सदू : (शक्य तितक्या संयमानं) बरं, ऐक! रोज तुला धक्के बसतायत! आज कोकणात बसला, उद्या ठाण्यात बसला, परवा आणखी कुठं बसला! असे आणखी किती धक्के खाणार आहेस?

दादू : (खोडकर सुरात) सध्या माझी अवस्था भूकंपाचे रोजच्या रोज धक्के खाणाऱ्या जपानसारखी आहे!!

सदू : (बुचकळ्यात पडत) म्हणजे?

दादू : (शाब्दिक कोटी सुचल्याच्या आनंदात) मी महाराष्ट्राचा धक्कापुरुष झालोय! हाहा!! जो येतोय तो मला धक्का देतोय! धक्क्यांवर धक्के खाऊन मी धक्काप्रुफ झालोय! मला हल्ली धक्क्यांचं काहीही वाटत नाही!

सदू : (कपाळाला हात लावत) अनुभवानं माणूस पक्का होतो, हेच खरं!

दादू : पक्कापुरुष वेगळा! त्यानंच तर हे धक्कातंत्र सुरु केलं! पक्कापुरुष आणि टक्कापुरुष एकत्र आले आणि त्यांनी मला धक्कापुरुष हा किताब बहाल केला!! आहे की नाही गंमत?

सदू : (हतबलतेनं) तुला काहीच कसं रे वाटत नाही?

दादू : (दिलखुलासपणे) त्यात काय वाटायचंय? असले मला धक्के देणारे आले आणि गेले! मराठी माणसानं असे अनेक धक्के पचवले आहेत! मीही बघतो, किती धक्के देतात ते! काही दिवस थांब, कळेल, कोण कोणाला धक्का देतंय ते!!

सदू : (थंडपणाने) काय करणार आहेस?

दादू : (त्वेषानं) एकच असा धक्का देईन ना, की हे पक्कापुरुष आणि टक्कापुरुष कुठल्या कुठे गायब होतील, आणि पुन्हा कधी दिसणार नाहीत!!

सदू : (कपाळाला हात लावत) तू अगदी अशक्य माणूस झालायस! धक्का, टक्का, पक्का…सतत कशाला शाब्दिक कोट्या करतोस?

दादू : (चेवात येत) माझं सोड, तुझा त्यांनी चक्कापुरुष केलाय! तुला चक्क्यासारखं टांगून ठेवलंय! हाहा हाहा!!

सदू : (चिडून) दादूराया…!

दादू : (सपशेल दुर्लक्ष करत) एकच असा धक्का देईन की धक्कापुरुषाचा सुक्कापुरुष होईल, आणि टक्कापुरुषाचा तर डायरेक्ट सुक्कापुरुषच करुन टाकीन! समजतात काय स्वत:ला लेकाचे! दादूचा इंगा बघितला नाही तुम्ही अजून!!

सदू : (आगीत तेल ओतत) मग दाखव ना तुझा इंगा! नुसते धक्के का खातोस?

दादू : (धोरणीपणाने) वेळ आली की मग दाखवीन! आत्ता मी धक्कापुरुष असलो तरी लौकरच मी बुक्कापुरुष होणार आहे! कळलं? जय महाराष्ट्र!!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.