दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्घाटनावेळी केलेलं भाषण गाजत आहे.
हे भाषण मोजकं असलं तरी ते आशयसंपन्न होतं. त्या भाषणातला बराचसा भाग हा वारकरी परंपरेच्या गौरवाचा होता.
या संमेलनात विठोबा रखुमाईची मूर्ती पंतप्रधानांना भेट दिली गेली. त्या निमित्ताने तारा भवाळकर यांनी त्यांच्या संपूर्ण भाषणात वारकरी संतांचं मोठेपण अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
आजवरच्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात काही वेळा मोजके संमेलनाध्यक्ष संतांविषयी बोललेले आहेत. यावेळी तारा भवाळकर यांनी संतांच्या पुरोगामी असण्यावर भर दिला. त्यामुळेच त्या भाषणाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.
मुळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात करणाऱ्या न्या. महादेव गोविंद रानडे यांनाच संतांविषयी फार आत्मियता होती. त्यांनीच सर्वात अगोदर सविस्तरपणे संतांचं पुरोगामीत्व समाजाच्या नजरेला आणून दिलं.
आजच्या संमेलनाच्या भाषणातही तारा भवाळकर यांनी त्याचा उल्लेख केला आहे. 'राईज ऑफ द मराठा पाॅवर' या रानडे यांच्या ग्रंथात आठवं प्रकरण महाराष्ट्रातल्या संतमहंताच्या विचार आणि कार्याची मांडणी करणारं आहे.
तारा भवाळकर यांनी उल्लेख केल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्याची पार्श्वभूमी तयार करण्याचं काम संतांनी केलं हा नवा सिद्धांत रानडे यांनी मांडला. तेव्हापासून संतांच्या कार्याकडे पुरोगामी अंगाने बघण्याचा दृष्टीकोन विकसीत होत गेला. त्याचं सार त्यांच्या भाषणात दिसलं.
'आमचे संत पुरोगामी होते' हे त्या भाषणातलं ठळक विधान गाजलेलं आहे. पुरोगामी याचा अर्थ समाजाच्या प्रगतीचा आधुनिक दृष्टीकोन असणं. मानवी मूल्यांच्या आधारे समकाळाच्या पुढे पाहणं म्हणजे पुरोगामीत्व. या अर्थाने वारकरी संत पुरोगामी होते.
संतांनी मराठी भाषेच्या साहित्यात योगदान तर दिलंच पण मराठी माणसांना नवा मूल्यविचारही दिला. हा मूल्यविचार मानवतेचा होता. सामाजिक समतेचा होता. धर्मचिकीत्सेचा होता. स्त्रियांना सन्मान देणारा होता.
त्यामुळेच गेली सात-आठ शतके महाराष्ट्रावर संतांचा प्रभाव राहिलेला आहे. हा प्रभाव जिवंत राहण्याचं कारण म्हणजे संतांचा सर्वसमावेशक विचार.
वारकरी संतांनी पहिलं मूल्य सामाजिक समतेचं दिलं. संतांनी जातीभेदाला ठामपणे विरोध केला.
'जया म्हणती नीचवर्ण। स्त्रीशूद्रादी हिनजन॥1॥
सर्वांभूती देव वसे।नीचाठायी काय नसे॥2॥'
असा रोखठोक सवाल एकनाथ महाराजांनी विचारला आहे. ज्या स्त्रीशूद्रांना तथाकथित उच्चवर्णीयांनी त्यांच्या संकुचित संस्कृतीतून वगळलं आहे त्यांची बाजू संतांनी लावून धरली. स्त्री शूद्रांच्या ठायी असलेल्या देवत्वाची आठवण करुन देत समतेचं तत्व सांगितलं.
संत केवळ सामाजिक समतेचा विचार मांडूनही थांबले नाहीत. त्यांनी त्यांच्या परीने त्या काळात जितकं शक्य तितकं कार्य करण्याचाही प्रयत्न केला. नामदेवरायांनी दलित मानल्या गेलेल्या चोखोबारायांची समाधी थेट पंढरपूरच्या मध्यवर्ती भागात मंदिरासमोर बांधली. दलितांना वेगळ्या स्मशानभूमी असलेल्या सामाजिक व्यवस्थेत हे फारच क्रांतीकारक पाऊल होतं.
विविध जातीजमातीतले संत चोखोबारायांच्या घरी जेवायला गेले होते. एकनाथ महाराज राणू नावाच्या एका दलित भक्ताच्या घरी जेवले. त्यासाठी संघर्ष केला. खरंतर आंतरजातीय सहभोजनाच्या चळवळी अलीकडच्या काळात झाल्या. त्यावेळीही प्रचंड संघर्ष सोसावा लागला. साधारण तेराव्या आणि पंधराव्या शतकात अशा प्रकारे आंतरजातीय सहभोजन करणं हे फारच धाडसाचं काम होतं. ते संतांनी केलेलं आहे.
संतांनी धर्माची चिकीत्सा केली. सर्व चिकीत्साची सुरुवात धर्मचिकीत्सेने होते तर धर्मचिकीत्सेची सुरुवात धर्मग्रंथाच्या चिकीत्सेने होते. संतांनी धर्मग्रंथाची चिकीत्सा केली. वेद हे त्यावेळचे धर्मग्रंथ होते. त्याचा अधिकार मात्र केवळ उच्चवर्णीय पुरुषांना होता.
स्त्रियांना आणि शूद्रातिशूद्रांना वेदाचा अधिकार नव्हता. हा वेदाचा दोष ज्ञानेश्वर माऊलींनी दाखवून दिला.
'वेदु संपन्नु होय ठायी। परि कृपणू ऐसा आनु नाही।
जो लागला कानी तिही। वर्णांच्याची॥'
असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. वेद दोषी असून तो स्त्री - शूद्रांच्या कानी लागला नाही असं संतांनी स्पष्टपणे म्हटलं.
'वेद आम्हावरी रुसोनिया गेला। आम्ही त्याच्या बाला धरले कंठी॥' असं तुकोबाराय म्हणतात. पुढे जाऊन त्यांनी 'वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा' असं म्हणत वेदांवरच्या मक्तेदारीला आव्हान दिलं.
महाराष्ट्रातलं वारकरी संतमंडळ हे बहुविध जातीतून आलेल्या संतांनी बनलेलं आहे. विशेषतः नामदेवरायांच्या काळात संत म्हणून मान्यता पावलेल्या संतांवर नजर फिरवली तरी हे आपल्या सहज लक्षात येईल.
जवळपास 20 - 25 वेगवेगळ्या जातीतल्या स्त्री - पुरुष संतांनी ही परंपरा घडवली आहे. त्यातले बहुतेक संत हे अंत्यज आणि शूद्र मानल्या गेलेल्या जातीतले होते. आजच्या भाषेत सांगायचं असेल तर बीसी आणि ओबीसी जातीतले हे संत होते असा उल्लेख ताराबाईंनी त्यांच्या भाषणात केला.
हे संत परिघाबाहरेचे होते. या संतमंडळात जसे बहुजन संत होते तसे उच्चवर्णीय संतही होते. हे सगळे संत अंतर्बाह्य समतावादी होते. त्यामुळेच परिसा भागवत, अनंतभट्ट अभ्यंग, महादजीपंत कुलकर्णी, बहिणाबाई आणि निळोबाराय असे अनेक संत ब्राह्मण असूनही बहुजन संतांना गुरु मानत असत.
बहुजन संतांना नमस्कार करत असत. हेच अनेक जातीभिमानी सनातन्यांना सहन होत नव्हतं. त्यामुळेच त्यांनी संतांविरोधात तक्रारी केल्या.
वारकरी परंपरेत संत स्त्रियांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता. विशेष म्हणजे यातल्या बऱ्याच स्त्रिया एकल होत्या. जनाबाई, मुक्ताबाई आणि कान्होपात्रा या एकल महिला वारकरी परंपरेत संतपदाला पोचल्या. त्याचबरोबर सोयराबाई, निर्मळा आणि बहिणाबाई अशा स्वयंप्रज्ञ स्त्रियांनीही आपल्या कर्तृत्वाने वारकरी संप्रदायात स्थान मिळवलं आहे.
वारकरी संप्रदाय हा सर्वसमावेशक आहे. त्यात हिंदू संतांबरोबर मुस्लिम संतही आहेत. तुकोबारायांच्या अभंगात या मुस्लीम संतांचा उल्लेख येतो.
'कबीर मोमीन लतिफ मुसलमान। सेना न्हावी जाण विष्णूदास॥'
असं तुकोबाराय म्हणतात. यातील कबीर हे वारकरी संप्रदायातील पाच प्रमुख संतांपैकी एक आहेत.
लतिफ हे वारकरी परंपरेतील आणखी एक प्रसिद्ध संत. त्यांच्या अभंग रचनाही आहेत. त्याचबरोबर शेख महंमद, चांद बोधले, अनगडशहा फकीर असे अनेक मुस्लिम संत वारकरी परंपरेत आहेत.
अलीकडच्या काळातही जैतुनबी माऊली, वजीरखान आणि अकबर आबा शेख असे मुस्लीम वारकरी होऊन गेले. थोडक्यात जात-धर्म आणि लिंग असा कोणताही भेदभाव न मानणारी ही परंपरा आहे.
संतांनी प्रत्येक जातीजमातीत संवाद आणि संपर्क वाढवला. त्यांच्यात आपुलकीची आणि एकत्वाची भावना निर्माण केली. संतपरंपरा खेड्यापाड्यातल्या निरक्षर आणि सर्वसामान्य लोकात पोचली. त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण झालं.
वारकरी परंपरेच्या संस्कारातून घडलेल्या मावळ्यांच्या बळावरच स्वराज्य उभं राहिलं. त्याची मांडणी न्या. रानड्यांचा दाखला देत तारा भवाळकरांनी केली. हाच विचार पुढे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही मांडला. त्यांच्या 'जातीव्यवस्थेचे उच्छेदन' या ग्रंथात हा उल्लेख आला आहे. त्यांच्या मते कोणतीही राजकीय क्रांती घडण्यासाठी त्या अगोदर सामाजिक - सांस्कृतिक स्वरुपाची क्रांती घडावी लागते.
सामाजिक प्रबोधनाच्या मशागतीमुळे राजकीय क्रांती होते. हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी जगभरातील उदाहरणं दिली आहेत. केमालपाशाचंही उदाहरण दिलं आहे. त्याचप्रमाणे भारतातील तीन उदाहरणं दिली आहेत. पहिलं उदाहरण बौद्धांचं आहे. बौद्धांनी सामाजिक क्रांती केली त्यातून मौर्य राजवट निर्माण झाली. दुसरं उदाहरण संतांचं आहे.
महाराष्ट्रातल्या वारकरी संतांच्या सामाजिक क्रांतीची पार्श्वभूमी लाभली त्यामुळे शिवाजी महाराजांना स्वराज्य उभा करता आलं, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते.
ताराबाईंनी त्यांच्या भाषणात 'विठोबा' या देवाचं वेगळेपणही सांगितलं. विठोबा हा श्रमकऱ्यांचा देव आहे. तो सोवळ्या - ओवळ्यातला नाही. मराठी माणसांसारखाच तो काळा सावळा आहे. मराठी माणसाला गोर्या रंगाचं आकर्षण नाही. इथे पांढरपेशा संस्कृतीला कधीच उत्तेजन मिळालं नाही.
श्रमकऱ्यांच्या प्रतिभेतून घडलेलं हे दैवत आहे. ते दैवत महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक संस्कृतीचं प्रतिक आहे. खरंतर विठोबाची जी प्रतिमा संतांनी घडवली ती ही पुरोगामी आहे. त्यामुळेच तर या विठोबाच्या कथेत 'उच्चनीच काही नेणे भगवंत' या न्यायाने सामाजिक समतेचा मूल्यविचार आलेला आहे.
तो चोखोबांच्या घरी आंबिल पितो. मेलेली जनावरे ओढताना त्यांना मदत करतो. जनाबाईंना अंघोळ घालतो. सावतोबांना खुरपायला मदत करतो. रोहिदासांसाठी कातडी रंगवतो. कहर म्हणजे तो सज्जन कसायाला मांसही विकू लागतो.
विठोबाची ही प्रतिमा इतर देवांहून फारच वेगळी आहे. 'ऐसा विटेवर देव कोठे' असं आव्हान त्यामुळेच संतांनी दिलं आहे. अलीकडच्या काळात विठोबाच्या प्रतिमेतलं हे पुरोगामीत्व अनेकांनी मांडलं आहे. स्वतः संतांनी तर ते अगदी सविस्तरपणे मांडलं होतं. त्याचाच आधार घेत सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांनी 'विठोबाची शिकवण' हे पुस्तक लिहिलं.
म. वा. धोंड यांनी 'ऐसा विटेवर देव कोठे' हे पुस्तक लिहिलं. या दोन्ही पुस्तकातून विठोबाची संतांनी घडवलेली प्रतिमा समोर आलेली आहे. विठोबा हे प्रतिक आणि त्या प्रतिकामागचा संतांचा मूल्यविचार तारा भवाळकर यांच्या भाषणात प्रभावीपणे आला. साहित्य संमेलनाच्या विचारपिठावरुन स्वतः संमेलनाध्यक्षांनी तो मांडल्यामुळे त्याला आणखी वेगळं महत्त्व प्राप्त झालंय.
संतांनी मराठी भाषेसाठी योगदान दिलेलं आहे. मराठी जिवंत ठेवण्यात संतांचा फार मोठा वाटा आहे. साने गुरुजींनी संतांना बंडखोर म्हटलं होतं. संतांनी पहिली बंडखोरी केली ती मराठीसाठी आणि मराठीच्या निमित्ताने ती भाषा बोलणार्या आम जनतेसाठी.
संस्कृत भाषा ही त्याकाळी धर्माची भाषा होती. ती देवभाषा मानली जात होती. ज्ञानभाषा मानली जात होती. मराठीपेक्षा श्रेष्ठ मानली जात होती. संतांनी हे नाकारलं. संस्कृतमधील गीता आणि भागवत हे दोन्ही ग्रंथ संतांनी मराठीत आणले.
भागवत ग्रंथावर मराठीत भाष्य लिहिलं म्हणून एकनाथ महाराजांना फार संघर्ष करावा लागला. त्यांच्याविरोधात काशीच्या धर्मपिठासमोर तक्रार झाली. ज्याच्याकडे ही तक्रार झाली तो पंडित इतका उद्दाम होता की तो एकनाथ महाराजांना समोर पहायलाही तयार नव्हता.
प्राकृत मराठीतून ज्ञान सांगणाऱ्या या माणसाचं तोंडही पाहिलं जाऊ नये म्हणून त्यानं पडदा लावला. त्या पडद्यामागून तो नाथांशी वाद घालत होता.
'संस्कृत भाषा देवे केली। प्राकृत काय चोरापासून झाली?' हाच नाथांचा यावरचा तर्कशुद्ध युक्तिवाद होता. संस्कृत भाषा देवापासून झाली असेल तर मराठी चोरापासून झाली का? असा सवाल नाथांनी विचारला. तो सवाल निरुत्तर करणारा होता. संस्कृत भाषेवरच्या मक्तेदारीतून निर्माण झालेल्या विषमतेलाही हादरा देणारा हा विचार होता.
तारा भवाळकर यांनी त्यांच्या भाषणात संतांविषयी केलेली ही मांडणी फारच महत्त्वाची होती. पुरोगामी हा शब्दही आज उपहासाचा शब्द बनला आहे. उपहासाने 'फुरोगामी' म्हणत या विचारांच्या लोकांची कुचेष्टा केली जात आहे. हिणवलं जात आहे. त्या पार्श्वभूमीचाही उल्लेख करत त्यांनी संत हे पुरोगामी विचारांचे होते हे ठामपणे सांगितलं.
पुरोगामी विचार हा मानवतेचा विचार आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये पुरोगामी विचारसरणीतून निष्पन्न झालेली आहेत. संतांचा विचार - व्यवहार बघता ते पुरोगामी ठरतात हे ऐतिहासिक वास्तव आहे. याच वास्तवाचा उच्चार तारा भवाळकर यांनी ठामपणे केला.
त्यांनी तसा उल्लेख केला याचं कारण त्यांच्यावरचा संतांचा प्रभाव. त्यांच्यावरचा हा संतांचा प्रभाव अनेक कारणांमुळे आहे. त्या लहानपणापासूनच कीर्तन ऐकत असत. तो प्रभाव तर होताच पण पुढे त्यांना लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा सहवास मिळाला. त्यांनी त्यांच्या आधीच्या भाषणात आणि पुढे झालेल्या सविस्तर भाषणातही त्यांच्या जडणघडणीतलं लक्ष्मणशास्त्रींचं योगदान सांगितलं.
लक्ष्मणशास्त्री हे महाराष्ट्रातील प्रकांडपंडित विद्वान होते. तारा भवाळकर यांच्यावरच्या संतांच्या प्रभावाचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. लक्ष्मणशास्त्री हे वाईच्या प्राज्ञपाठशाळेच्या मंडळात घडले. या पाठशाळेतून अनेक पुरोगामी विचारांचे धर्मशास्त्राचे जाणकार पंडित तयार झालेले होते. ते जातीभेद आणि अस्पृश्यतेच्या विरोधात होते. त्यासाठी ते धर्मशास्त्राचे दाखले देत.
'यातायातीधर्म नाही विष्णुदासा।
निर्णय हा ऐसा वेदशास्त्री॥'
असं तुकोबारायांनी म्हटलंय.
तुकोबारायांनी ज्याप्रमाणे वेदशास्त्राचा अन्वयार्थ समतावादी पद्धतीने लावला त्याचप्रमाणे ही धर्मज्ञ मंडळीही वेदशास्त्राच्या आधारेच समतेचा पुरस्कार करत असत. त्यांचे सनातनी पंडितांबरोबर वादविवादही घडत. पण या पुरोगामी धर्मपंडित मंडळींवर संतांचा तसा फारसा प्रभाव नव्हता. याला दोन पंडित अपवाद होते. पहिले नरहरशास्त्री जोशी खर्शीकर आणि दुसरे लक्ष्मणशास्त्री जोशी.
नरहरशास्त्रींवर संतांचा आणि दादा महाराज सातारकर यांचा फार मोठा प्रभाव होता. लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी त्यांच्या लिखाणातून सतत संतांचा उल्लेख केलेला आहे. तारा भवाळकर यांना वारकरी संतांविषयी आत्मियता वाटण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत.
लोकसाहित्यात संतांचे विपुल दाखले सापडतात.
'पंढरीत नाही गं कशाची निवड।
देवा विठ्ठलाला चोखामेळ्याची आवड॥'
आणि 'पंढरीच्या वाळवंटी कथा करती चांभारीण।
तिच्याबी कीर्तनाला लुब्ध झालाय नारायण॥'
अशा लोकसाहित्यातल्या अनेक ओव्यांमधून संतांचं पुरोगामीत्व अधोरेखित झालेलं आहे. याच प्रभावातून तारा भवाळकर यांनी संतांचं मोठेपण सांगितलं आहे.
स्वतः तारा भवाळकर यांना संतसाहित्याविषयी आस्थाही आहे आणि अभ्यासही आहे. त्यांच्या 'स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर' या पुस्तकातून स्त्रि संतांकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन मिळतो. त्यांच्या मनातील संतांविषयीची ही आस्था, आत्मियता आणि अभ्यास त्यांच्या आजच्या भाषणातून प्रकट झालाय.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.