तामसा : हदगाव तालुक्यातील शिवपुरी येथील श्रीक्षेत्र कोंडलिंगेश्वर मंदिर परिसर महाशिवरात्र पर्वानिमित्त लक्षदीपारधन महोत्सवाने उजळून निघत आहे. गुरुवारी ता.२० पासून चालू झालेल्या हा नेत्रदीपक अध्यात्मिक सोहळा महाशिवरात्रीपर्यंत चालणार आहे.
मंदिराचे महंत विरागीदास महाराज यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. कोंडलिंगेश्वर मंदिर हे हेमाडपंथी असून अंदाजे सातशे फूट उंच डोंगरावर वसलेले आहे. रात्री पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाणाऱ्या नागमोडी रस्त्याच्या दोन्ही बाजूने हजारो दिवे प्रज्वलित केले जात आहेत.
यामुळे रस्ता व मंदिर परिसर अध्यात्मिक दीपोत्सवाने उजळून निघत आहे. हा सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहत आहेत. शास्त्रात दीपाराधनाला धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व असून महाशिवरात्रीनिमित्त होणारा हा सोहळा पंचक्रोशीतील भाविकांसाठी आकर्षण ठरून डोळ्याचे पारणे फेडणारा असल्याचे महंत विरागीदास महाराज यांनी महोत्सवाची सुरुवात करताना सांगितले.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख, निराधार समिती अध्यक्ष भागवत देवसरकर, भाजपाचे ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष बापूराव घारके, बाजार समितीचे माजी उपसभापती विशाल परभणकर आदीसह हजारो भाविक उपस्थित होते.
यानिमित्त मंदिरात अभिषेक,विधीपाठ, शिवलीलामृत व परमाब्धी पारायण, षडाक्षर वैश्विक मंत्रजप, नादब्रह्म संगीत सेवा, रक्तदान शिबिर, भजन आदी कार्यक्रम होत आहेत. मंदिर परिसरात सप्ताहभर रात्री गजानन महाराज भड (वाशिम), डॉ. दत्ता महाराज वळसंगवाडीकर (कंधार), रामेश्वर महाराज मगर (छत्रपती संभाजीनगर), शिवचैतन्य शिवाचार्य महाराज (हदगाव), महंत प्रभाकरबाबा कपाटे (भोकर), अभय महाराज ( अनसिंग), साध्वी मुक्ताईनाथ माऊली (टाकराळा) यांची कीर्तनसेवा असून काल्याचे किर्तन ज्ञानेश्वर महाराज बंडेवाड (अहमदपूर) यांचे आहे. लक्षदिपारधन महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन विरागीदास महाराज व ग्रामस्थांनी केले आहे.