टीम इंडियाने कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. टीम इंडियाने रविवारी 23 फेब्रुवारीला पाकिस्तानचा पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला. टीम इंडियाने यासह उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. टीम इंडियाने रविवारी विराट कोहली याने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर पाकिस्तानवर 6 विकेट्सने विजय मिळवला. तसेच श्रेयस अय्यर यानेही अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 242 धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं. टीम इंडियाचं या विजयानंतर सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात आलं. तर दुसऱ्या बाजूला भारताच्या माजी खेळाडूने संताप व्यक्त केला.
टीम इंडियाचा माजी खेळाडू डोडा गणेश याने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट करत आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिलीय. डोडा गणेशने केएल राहुल याच्या बॅटिंग पोजिशन बदलण्यावरुन संताप व्यक्त केला. केएल राहुल साधारणपणे पाचव्या स्थानी बॅटिंगसाठी येतो. मात्र पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केएलला बॅटिंगसाठी पाचव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी पाठवलं नाही. डोडा गणेश याने याच मुद्द्याला हात घातला आणि मनात जे होतं ते बालून टाकलं.
“काहीही झाले तरी आम्ही केएल राहुलला पाचव्या स्थानी बॅटिंग करून देणार नाही. आता त्याला (केएलला) सातव्या स्थानी ढकलण्यात आलंय. हे असं करणं मूर्खपणाचे होतं असं म्हणणे कमी ठरेल”, असं डोडा गणेशने ट्विटमध्ये म्हटलं.
गौतम गंभीर कोच झाल्यानंतर टीम इंडियात लेफ्ट-राईट कॉम्बिनेशनला फार महत्त्व दिलं जात आहे. या कारणामुळेच श्रेयस अय्यर याच्यानंतर अक्षर पटेल बॅटिंगसाठी येतो.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), इमाम उल हक, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.