इंदापूर - राज ठाकरेंच्या एवढ्या मोठ्या सभा होऊही त्यांचा एकही माणूस निवडून येत नाही लोकसभेला त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्याचा फारसा फायदा झाल्याचे मला दिसत नाही. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असे वाटत नाही. आणि जरी एकत्र आले तरी महायुतीवर त्याचा परिणाम होणार नाही. असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना आठवले बोलत होते. यावेळी विक्रम शेलार, शिवाजीराव मखरे, बाळासाहेब सरवदे, संदिपान कडवळे, अमोल मिसाळ, हनुमंत कांबळे, अरविंद वाघ, कैलास कदम, किरण गानबोटे, लखन जगताप, रमेश शिंदे यांनी आठवले यांचा सत्कार केला.
यावेळी प्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना आठवले म्हणाले, इंदापूर पोलीस खोटे गुन्हे करत असल्याचे सांगितले जाते. कोणताही गुन्हा खोटा असू नये. अशा घटना घडत असतील तर मी पोलीस अधीक्षकांशी चर्चा करेल. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण चुकीच्या गोष्टी करू नये. चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांचं पाठबळ असायला हवे. असे गुन्हे नोंदवले जाऊ नये यासाठी मी नक्की प्रयत्न करेन.
'लव्ह जिहाद'चा कायदा असा आहे की, अनेक वेळा मुलं मुली एकत्र येतात त्यांना त्यांची जात माहित नसते. तरी देखील एकत्र येऊन संसार थाटावा अशी त्यांची इच्छा असते. धर्म जात बाजूला ठेवून दोघे एकत्र येतात. प्रत्येक केस ला लव्ह जिहाद म्हणू नये.असेही आठवले यांनी सांगितले.
निलम गोऱ्हे ह्या समाजवादी म्हणून निवडून आल्या आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महिलेचा अपमान करणारे जे वक्तव्य केले आहे ते योग्य नाही. तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्था चांगले ठेवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत. तरी देखील काही घटना होत आहेत. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी होत असतो. या सरकारला सत्तेत आणण्यात दलितांचा फार मोठा वाटा असल्याचेही आठवले यांनी सांगितले.