न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेधारकांना मोठा दिलासा; आरबीआयने 25 हजारांपर्यंत पैसे काढण्याची दिली परवानगी
News about New India Co-operative Bank : काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यावसायिक क्रियाकलापांवर बंदी घातली होती. याअंतर्गत बँक कोणतेही नवीन कर्ज देऊ शकणार नाही किंवा कोणतीही ठेव घेऊ शकणार नाही. लोकांनाही त्यांचे पैसे काढता येणार नाहीत. या प्रकरणात, रिझर्व्ह बँकेने खातेधारकांना आता २५,००० रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी देऊन मोठा दिलासा दिला आहे.रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर बंदी घातल्यानंतर न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे खातेदार खूप चिंतेत पडले होते. आरबीआयने ठेवीदारांच्या पैसे काढण्यावरही बंदी घातली होती, जी आता एका विशिष्ट मर्यादेपर्यंत काढून टाकण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने X वर पोस्ट करून याबद्दल माहिती दिली आहे.नुकतीच रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेसाठी प्रशासक आणि सल्लागारांची समिती नियुक्त केली होती. त्यांच्यासोबत बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यानंतर, रिझर्व्ह बँकेने खातेधारकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत २७ फेब्रुवारी २०२५ पासून प्रत्येक खातेधारकाला २५,००० रुपयांपर्यंत पैसे काढता येतील.रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार या सवलतीनंतर बँकेच्या एकूण खातेधारकांपैकी सुमारे ५० टक्के म्हणजेच निम्मे खातेदार त्यांचे संपूर्ण शिल्लक पैसे काढू शकतील. उर्वरित अर्धे खातेधारक त्यांच्या खात्यातून २५ हजार रुपयांपर्यंत पैसे काढू शकतील. हे पैसे काढण्यासाठी, खातेदार बँकेच्या शाखेत जाऊ शकतो किंवा बँकेच्या एटीएम चॅनेलचा वापर देखील करू शकतो. तसेच, काढता येणारी एकूण रक्कम २५,००० रुपयांपर्यंत किंवा त्यांच्या खात्यातील एकूण शिल्लक, यापैकी जी कमी असेल ती आहे.