2025 वर्षाच्या अखेरपर्यंत Nifty पुन्हा गाठणार 'ही' पातळी; जागतिक ब्रोकरेज फर्मने वर्तवला अंदाज
ET Marathi February 25, 2025 02:45 PM
Stock Market : गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यांपासून शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींसह देशांतर्गत कमकूवत आर्थिक वातावरण यासाठी कारणीभूत ठरत आहे. मात्र, आता एक आनंदाची बातमी आली आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म सिटी भारतीय शेअर बाजाराबाबत उत्साही आहे. सिटीने सोमवारी सांगितले की, या वर्षी डिसेंबरपर्यंत निफ्टी ५० निर्देशांक २६,००० च्या पातळीवर पोहोचेल अशी अपेक्षा आहे, जी सध्याच्या पातळीपेक्षा १५ टक्क्यांनी वाढ दर्शवेल.ब्रोकरेज फर्मने भारताबद्दलचा आपला दृष्टिकोन 'न्यूट्रल' वरून 'ओव्हरवेट' असा अपग्रेड केला. याचे कारण म्हणजे भारतीय शेअर बाजाराचे आकर्षक मूल्यांकन आणि मागणीत होणारी वाढ होय. भारतीय शेअर बाजारातील वाढीमागे सिटीने अनेक कारणे सांगितली आहेत. रेपो दरात आणखी कपात२०२५-२६ या आर्थिक वर्षातील सर्वसाधारण अर्थसंकल्पात आयकरात कपात केल्याने देशातील वापर वाढेल, असे ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे असून भांडवली खर्चात सुधारणा होत आहे. विकास दर वाढवण्यासाठी सरकार पायाभूत सुविधांवर सतत खर्च करत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ब्रोकरेज हाऊसने अहवालात पुढे म्हटले की, आरबीआयने या महिन्याच्या सुरुवातीलाच रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली असून आणखी ०.५० टक्क्यांची कपात केली जाऊ शकते. भारतीय बाजारांमध्ये घसरणशेअर बाजारातील मोठ्या घसरणीचा विचार करता गेल्या या वर्षाच्या सुरूवातील बीएसईचे बाजार भांडवल ४४३.४७ लाख कोटी इतके होते. जे आता ३९८ लाख कोटी रुपयांवर घसरले होते. म्हणजेच यामध्ये १० टक्क्यांनी घट झाली आहे. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सातत्याने होणाऱ्या विक्रीचा सर्वाधिक फटका मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्सला बसला आहे. एकट्या फेब्रुवारी महिन्यात बीएसईचे आतापर्यंत ३६ लाख कोटींचे नुकसान झाले आहे.