अभिजित देशमुख
कल्याण : गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कल्याण जवळील मोहने परिसरात घडली आहे. सिलेंडरच्या झालेल्या स्फोटामुळे घडलेल्या दुर्घटनेत घरातील बारा वर्षीय मुलीसह तिची आई आणि एक इसम असे तीन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जवळील मोहने परिसरात वास्तव्यास असलेले अनिता जाधव, तिची मुलगी मोहिनी जाधव आणि विजय तांडेल अशी या घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान सकाळी कामावर जाण्यासाठी तयारी सुरु असताना घरात स्वयंपाक सुरु होता. याच वेळी सिलेंडरमधूल गॅस लीक होऊन अचानक चा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे भडका उडून घरात असलेल्या तिघेजण जखमी झाले आहेत.
स्फोटात घरातील साहित्याचे नुकसान
सिलेंडरचा स्फोट इतका होता कि परिसरात यामुळे जोरदार हादरा बसला होता. यामुळे परिसरात नागरिक भयभीत होऊन घराबाहेर आली होती. दरम्यान या स्फोटामुळे घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घराचा दरवाजा देखील तुटून दूरवर पडला होता. यात अनिता जाधव, मोहिनी जाधव व अन्य एक इसम जखमी झाले आहेत. त्यांना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मोठी दुर्घटना टळली
दरम्यान स्फोट झाल्यानंतर घरातील काही वस्तुंना आग लागली होती. याबाबत अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेत घरातील सामानाचे नुकसान झाले आहे .स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार गॅस गळतीमुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.