Pakistan News : ना विमान, ना प्रवासी, ना कसला लाभ; पाकमधील ग्वादर विमानतळाचे गूढ कायम, शहराची अवस्था बिकट
esakal February 25, 2025 11:45 PM

ग्वादर (पाकिस्तान) : विमानतळ म्हटले की विमानांची ये-जा, प्रवाशांची लगबग असते. पाकिस्तानातील सर्वांत नवीन आणि सर्वाधिक महागड्या ग्वादर विमानतळावर ना विमाने उतरतात, ना प्रवासी दिसतात.

त्यामुळे, या विमानतळाबद्दल काहीसे गूढ तयार झाले आहे. चीनच्या संपूर्ण आर्थिक मदतीतून हा विमानतळ उभारला असून चीनने २४ कोटी डॉलरचे अर्थसाहाय्य केले आहे. पाकिस्तानातील किनारी शहर असलेल्या ग्वादरमध्ये ऑक्टोबर २०२४ मध्ये या विमानतळाचे काम पूर्ण झाले. मात्र, तो अद्यापही सुरू झालेला नाही.

सभोवतालच्या अशांत नैऋत्य बलुचिस्तानपेक्षा विमानतळ वेगळा आहे. गेल्या दशकभरात चीनने अब्जावधी डॉलरच्या प्रकल्पाचा भाग असलेल्या या विमानतळासाठी प्रचंड खर्च केला आहे. हा चीनमधील पश्चिम शिनजियांग प्रांताला अरबी समुद्राशी जोडणारा हा प्रकल्प चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणूनही ओळखला जातो.

कायापालट घडवून आणणारा विमानतळ असा याचा उल्लेख होत असला तरी प्रत्यक्ष ग्वादरमध्ये बदलाचे कसलेही वारे दिसून येत नाहीत. पाकनजीकच्या इराणमधून येणाऱ्या राष्ट्रीय विद्युत ग्रीडशी किंवा सौर पॅनेलशी हे शहर जोडले गेलेले नाही. शहराला पुरेसे स्वच्छ पाणीही मिळत नाही. जवळपास एक लाख लोकसंख्येच्या ग्वादर शहरातील नागरिकांचे सुमारे चार लाख प्रवासी हाताळण्याची क्षमता असणाऱ्या या विमानतळाला प्राधान्य नाही. मात्र, हा विमानतळ ग्वादर किंवा पाकिस्तानसाठीही बनविला नसल्याचे आंतरराष्ट्रीय विश्लेषक व पाकिस्तान-चीन संबंधांचे तज्ज्ञ अझीम खालिद यांनी सांगितले.

रोजगाराचे आश्वासन हवेतच?

चीन-पाकिस्तान कॉरिडॉरमुळे दोन हजार स्थानिकांना रोजगार मिळतील, असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, हे रोजगार बलूच रहिवाशांना मिळणार की पाकिस्तानी, हे सरकारने स्पष्ट केले नाही, असाही आक्षेप घेतला जातो. त्यावर अधिकाऱ्यांचे मौनही बरेच काही सांगून जाते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.