Pune News : बारामती येथे जानेवारी महिन्यात आयोजित ‘कृषिक-2025’ प्रदर्शनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बारामती आणि बीड जिल्ह्यात परळी येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर महिन्याभरातच सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन त्या प्रस्तावांना आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
नवीन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयांमुळे बारामती आणि परळी येथेल पशुपालकांना अत्याधुनिक, दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा मिळणार असून, राज्यात प्रशिक्षित पशुवैद्यकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. राज्यातील पशुधनाच्या आरोग्याची काळजी आणि विकासासाठी ही पशुवैद्यकीय महाविद्यालये महत्वाची भूमिका बजावतील.
बारामतीतील घोषणा महिनाभरात पूर्णबारामती येथे जानेवारी महिन्यात आयोजित 'कृषिक-2025' कृषी प्रदर्शनात, शेतकरी आणि पशुपालकांनी बारामतीमध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी केली होती. या मागणीला तातडीने प्रतिसाद देत ही महाविद्यालये स्थापन करण्यात येतील, अशी घोषणा अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर महिन्यातच दादांनी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून दिली.
बारामतीतील कऱ्हावागज येथे 82 एकर आणि परळीच्या लोणी येथे 75 एकर जागेवर ही शासकीय महाविद्यालये उभारली जाणार आहेत. या शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयांसाठी मोठ्या प्रमाणात पदनिर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक महाविद्यालयासाठी शिक्षक संवर्गात 96, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी 138 नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्याशिवाय, बाह्यस्त्रोतांद्वारे प्रत्येकी 42 पदे मानधन तत्त्वावर भरण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
महाविद्यालयांसाठी 1129 कोटींची आर्थिक तरतूदबारामती आणि परळी येथील महाविद्यालयांसाठी एकूण 1129.16 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक महाविद्यालयासाठी 564.58 कोटी रुपये खर्च होणार असून, या निधीतून प्रगत संशोधन केंद्रे, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि आधुनिक सुविधा उभारल्या जातील. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तसेच पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणारे अजित पवार यांनी महिन्याभरातच हा निर्णय़ घेतला आहे.