आज महाशिवरात्री आहे. शिवरात्रीच्या शाही स्नानानंतर आज महाकुंभाची देखील सांगता होईल.
महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. महाशिवरात्रीला 'शिवरात्री' असंही म्हटलं जातं.
हा हिंदू त्रिमूर्तीपैकी एक देव असलेल्या आणि ब्रह्मांडाचा नाश करणाऱ्या शिवाला समर्पित असणारा हिंदू सण आहे.
बहुतांश हिंदू सण दिवसा साजरे केले जातात. महाशिवरात्री हा सण रात्री आणि दिवसाही साजरी केली जाते. महाशिवरात्री ही अमावस्येच्या आधी येते.
प्रत्येक अमावास्या शिवाला म्हणजे शंकराला समर्पित केली जाते. परंतु महाशिवरात्रीला विशेष महत्त्व असतं.
कारण ही ती रात्र आहे जेव्हा शंकरानं 'तांडव' नृत्य केलं. हे शिवाचं ब्रह्मांडीय नृत्य आहे. हे नृत्य जीवनाच्या शाश्वत चक्राचं प्रतीक आहे.
'महाशिवरात्री' शिव आणि सतीचा विवाह सोहळा म्हणूनही ओळखला जातो. ही रात्र अंधकार आणि अज्ञानाचे प्रतीक मानली जाते. या रात्री शिवाची पूजा करून, भक्त अंधकारातून प्रकाशाच्या आणि अज्ञानातून ज्ञानाच्या मार्गावर जातात.
शिवाच्या दर्शनानं त्यांच्या जीवनातील दुःख आणि संकटं दूर होतात, अशी मान्यता आहे.
सणमहाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि पूजास्थळी रात्रभर जागरण करतात.
भगवान शंकराच्या विधीवत पूजेदरम्यान त्या हंगामातील फळं, मुळांच्या भाज्या आणि नारळापासून बनवलेले विशेष अन्न अर्पण केले जाते.
जे महाशिवरात्रीला उपवास करतात. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडावा. उपवास सोडताना शिवाला अर्पण केलेला प्रसाद (अन्नार्पण) खावा.
चांगला पती मिळावा म्हणून तरुण मुली उपवास आणि शिवाची पूजा करतात. भगवान शंकराची स्तुती करण्यासाठी भक्तिगीतं गातात, आणि संपूर्ण रात्रभर पवित्र शास्त्रांचे पठण केले जाते.
मंदिरातील पुजारी किंवा पंडित शास्त्रानुसार पूजा (धार्मिक पूजा) करतात. हे रात्री चार वेळा केलं जातं.
मंदिरांमध्ये शिवलिंगाची पूजा केली जाते. भगवान शिवाचे प्रतीक असलेल्या शिवलिंगाला स्नान घालण्यासाठी भाविक मंदिरांमध्ये गर्दी करतात.
त्या शिवलिंगाला दूध, पाणी आणि मधानं स्नान घातलं जातं आणि नंतर चंदन लावण्यात येतं. फुलं आणि हारांनी शिवलिंग सजवलं जातं.
महाशिवरात्री उत्सवाच्या आख्यायिकेनुसार, लुब्धका नावाचा एक गरीब आदिवासी माणूस हा शिवभक्त होता. तो एकदा सरपण गोळा करण्यासाठी घनदाट जंगलात गेला.
अंधार पडल्यामुळं तो जंगलात भरकटला. त्याला घराचा रस्ता सापडत नव्हता.
अंधारात लुब्धका एका बेलाच्या झाडावर चढला. पहाटेपर्यंत सुरक्षित राहण्यासाठी त्यानं झाडाच्या फांद्यांमध्ये आश्रय घेतला.
संपूर्ण रात्रभर तो वाघ आणि जंगलातील हिंस्त्र प्राण्यांचा आवाज ऐकत होता. तो प्रचंड घाबरला होता. त्यामुळं झाडावरुन उतरायलाही त्याला भीती वाटत होती.
स्वतःला जागं ठेवण्यासाठी त्यांनं शिवाचं नामस्मरण करायला सुरुवात केली. नामस्मरण करत असताना तो झाडाचे एक-एक पान तोडून टाकत होता.
सूर्योदयापर्यंत त्यानं हजारो पानं एका शिवलिंगावर टाकली होती. अंधारात त्यानं हे पाहिलं नव्हतं. लुब्धकानं रात्रभर केलेल्या उपासनेमुळं भगवान शंकर प्रसन्न झाले.
शिवाच्या कृपेनं वाघ आणि वन्य प्राणी तिथून निघून गेले. लुब्धका केवळ बचावला नाही तर त्याला 'दैवी आशीर्वाद'ही मिळाला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)