पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेची सुसज्ज अशी पाच नाट्यगृहे, तर अद्यावत असे ऑटो क्लस्टरसारखे सेंटर असताना महापालिका प्रशासन निसर्गाच्या सान्निध्यातील ताम्हिणी घाटात असणाऱ्या गरुडमाचीवर शहर धोरणावर चर्चा करणार आहे. तीन दिवस होणाऱ्या निवासी कार्यशाळेत आयुक्तांपासून अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्यासह आदी 49 वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. कार्यशाळेवर कामगार कल्याण विभागाच्या लेखाशिर्षावरील 8 लाख 54 हजार 320 रुपयांची उधळपट्टी करण्यात येणार आहे.
तीन दिवस निवासी कार्यशाळा
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापनेस 2032 मध्ये 50 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने महापालिकेने व्हिजन 50 शहर धोरण हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत महापालिका प्रशासनाने विविध विषय आणि भविष्यात येणाऱ्या समस्या, शहर विकासासाठी काय करावे, काय करू नये, कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे, यासाठी तीन दिवसांच्या निवासी कार्यशाळेचे दि. 28 ते दि. 2 मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पाच सुसज्ज नाट्यगृहे आहेत, तर चिंचवडमध्ये ऑटो क्लस्टर नावाने मोठे सेंटर आहे. याठिकाणी शहरातील विविध बड्या कंपन्यांचे कार्यक्रम, प्रदर्शने, बैठका, सांस्कृतिक कार्यक्रमासह आदी लहान-मोठे कार्यक्रम होतात. महापालिकेकडे शहरातच सुविधा उपलब्ध असताना प्रशासनाने ताम्हिणी घाटात असणाऱ्या गरुडमाची कॉर्पोरेट प्रशिक्षण केंद्रामध्ये शहर धोरणाच्या चर्चेसाठी सुमारे 10 लाख रुपये खर्च करून तीनदिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्याचा हेतू काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सात वर्षांत महापालिका या बाबींवर देणार भर
महापालिका सेवांमध्ये सुधारणे, शहरामध्ये सुधारणा करण्यासाठी दीर्घकालीन धोरण विकसित करणे, सर्वांगीण विकास करणे, शहरातील प्रत्येक नागरिकाला शहराची ओळख निर्माण करण्यासाठी विकास धोरणात समाविष्ट करणे, चिरस्थायी पर्यावरणपूरक शहर आणि शहराची वेगळी ओळख निर्माण करणे व शहर विकासासाठी आवश्यक परिणामांची वेगवान अंमलबजावणी करणे आणि महापालिकेचे कामकाज आणखी पारदर्शक होण्यासाठी शहरातील नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देणे आदी गोष्टींचा समावेश आहे. यासाठी शहरी गतिशीलता, पर्यावरण आणि राहणीमान, शिक्षण आणि कल्याण, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, आर्थिक विकास या प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित करणार आहे.
तीन दिवस शहराला वाली कोण?
निवासी कार्यशाळेसाठी आयुक्तांसह सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी शुक्रवारी (दि. 28) दुपारी दोन वाजता ताम्हिणी घाटातील गरुडमाचीकडे रवाना होणार आहेत. हे ठिकाण शहरापासून 75 किलोमीटर अंतरावर आहे. तीन दिवस अधिकारी मुक्कामी असणार आहेत. त्यामुळे तीन दिवस शहराला वाली कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
‘व्हिजन-50’ शहर धोरण उपक्रमांतर्गत पाच टप्पे
व्हिजन-50 शहर धोरण उपक्रमांतर्गत महापालिका विविध पातळ्यांवर चर्चासत्रे आणि नियोजन करणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांबरोबर गट चर्चा करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात अधिकारी व कर्मचारी यांच्यात चर्चा होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात बांधकाम व्यावसायिक, चौथ्या टप्प्यात माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि शेवटच्या पाचव्या टप्प्यात उद्योग, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली जाणार आहे.