स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराच्या घटनेनंतर राज्यभरात पडसाद उमटत आहेत. या घटनेतील संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर याआधीही वेगवेगळ्या पोलिस स्थानकात गुन्हे दाखल आहेत. तसंच तो राजकीय पक्षाशी संबंधित आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याच्याबाबत आता धक्कादायक अशी माहिती समोर आलीय. दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातल्या गुणाट या गावचा आहे. गुन्ह्यानंतर तो शिरूरला गेल्याची माहिती समोर आलीय.
दत्तात्रय गाडे हा पुणे ते अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतूक करायचा. तेव्हा तो वृद्ध महिलांन लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चारचाकी गाडीत बसवत असे आणि निर्जन स्थळी लुबाडत असे. एका महिलेच्या सतर्कतेमुळे दत्ता गाडे याला पोलिसांनी पकडलं होतं. शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.
दत्ता गाडे याचं शिरूर तालुक्यातल्या गुणाट गावी पत्र्याचं घर आहे. तर वडिलोपार्जित तीन एकर जमीनही आहे. आई-वडील शेती करतात. दत्ता गाडेला एक भाऊ, पत्नी, लहान मुलही असल्याची माहिती आहे. दत्ता गाडे काही काम करत नसे. त्याला झटपट पैसे कमावण्याचा नाद लागला आणि त्याच नादातून त्यानं चोरी करायला सुरुवात केली. महिलांना, वृद्धांना लुबाडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिलीय.
दत्ता गाडेनं २०१९ मध्ये कर्ज काढून एक चारचाकी गाडी खरेदी केली होती. त्या कारमधून तो पुणे ते अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतूक करायचा. त्यावेळीच त्यानं चोरी करायला सुरुवात केली. जास्त दागिने अंगावर असणाऱ्या महिलांना लिफ्ट द्यायचा. त्यांना निर्जन स्थळी नेत चाकूचा धाक दाखवून दागिने लुटायचा.
गुणाट गावात तंटामुक्तीच्या निवडणुकीसाठीही दत्ता गाडे उभा राहिला होता. मात्र निवडणुकीत त्याला पराभवाचा धक्का बसला होता. निवडणुकीच्या काळात राजकीय नेत्यासाठीही काम केलं होतं. नेत्यांसोबत गाडेचे फोटोही व्हायरल झाले होते. २०२० मध्ये त्यानं करे घाटात लूटमार केली होती. दरोड्या प्रकऱणी त्याला शिक्षाही झाली होती. त्याच्यावर शिक्रापूरमध्ये दोन, अहिल्यानगरमध्ये सुपा, केडगाव आणि कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.