सोलापूर : शिवशाही बस सुरू असताना ब्रेक आणि दरवाजा हवेच्या प्रेशरवर काम करतो. बस बंद होताच एक तासाच्या आत हवेचा प्रेशर कमी झाल्यानंतर बसचा दरवाजा अनलॉक होतो. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधमाने या तांत्रिक त्रुटीचा फायदा उचलला. संबंधित बस ही सोलापूर डेपोची असून त्या बसच्या चालकाकडून माहिती घेतली असता शिवशाही बसचे सत्य समोर आले.
सोलापूर आगाराचे चालक शंकर लालू चव्हाण हे मंगळवारी (ता. २५) रात्री नऊ ४५ ची सोलापूर- स्वारगेट (एम एच ०६ बी डब्ल्यू ०३१९) ही बस घेऊन पुण्याकडे गेले. स्वारगेट स्थानकावर बुधवारी (ता. २६) पहाटे तीन वाजून ४५ मिनिटांनी ही बस पोचली. नेहमीप्रमाणे चालक चव्हाण हे एका बाजूला बस लावून सोलापूर आगारासाठी असलेल्या विश्राम कक्षात जाऊन झोपले. सकाळी दहा वाजता स्वारगेट बस स्थानकावरील सुरक्षारक्षकांनी त्यांना झोपेतून जागे केले आणि एसटीच्या अधिकाऱ्याने त्यांच्याकडून जबाब लिहून घेतला. तोपर्यंत त्यांना घडलेल्या घटनेबद्दल काहीही माहीत नव्हते.
शिवशाही बस ही वातानुकलीत बस आहे. हवेच्या प्रेशरचे बटन दाबल्यानंतर दरवाजा चालू बंद होतो. ही यंत्रणा बस सुरू असताना सुरळीत चालते. मात्र, बस बंद झाल्यानंतर साधारणत: एक तासभर हवेचा दाब शिल्लक राहतो. त्यानंतर हळूहळू हवेचा दाब उतरल्यानंतर हा दरवाजा कोणीही हाताने उघडू शकते. अथवा बंद करू शकते. यामुळे एक तासानंतर ही बस ‘आओ- जाओ घर तुम्हारा’ अशा परिस्थितीत येते. याच तांत्रिक त्रुटीचा फायदा संबंधित नराधमाने उचलला आहे.
बस नॉनस्टॉप असल्याने नव्हता वाहक
सोलापूर-स्वारगेट ही बस नॉनस्टॉप आहे. या गाडीचे बुकिंग सोलापूरमधून तसेच मोहोळ, टेंभुर्णी येथून होते. या गाडीत वाहक नसतो. फक्त चालकच ही गाडी घेऊन जातात. यामुळे श्री. चव्हाण हे एकटेच गाडी घेऊन गेले होते. दरम्यान, संबधित बस पंचनाम्यासाठी पुणे येथेच असून चालक सोलापूरला आले आहेत.