मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींकडून करण्यात येत आहे. लाडक्या बहिणींना 27 फेब्रुवारीपासून हप्त्याची रक्कम दिली जाईल, अशी माहिती मिळाली होती. त्यामुळं लाडक्या बहिणींकडून हप्त्याची प्रतीक्षा केली जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजनेसाठी 3490 कोटी रुपयांच्या चेकवर सही केल्याची माहिती दिली होती. त्यामुळं लाडक्या बहिणींना गेल्या महिन्यांच्या तुलनेत लवकर रक्कम मिळेल अशी आशा होती.
डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 महिन्यात महाराष्ट्राच्या महिला व बालविकास विभागाकडून 1500 रुपयांचा हप्ता दोन्ही महिन्यांच्या 24 तारखेला वर्ग करण्यात आला होता. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी किती महिलांना लाभ दिला यासंदर्भातील माहिती दिली होती. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यात देखील लाडक्या बहिणींना 24 तारखेच्या दरम्यान पैसे मिळतील, अशी अपेक्षा होती.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्थ विभागानं 3490 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाला वर्ग करण्यात आला आहे. काही तांत्रिक बाबींमुळं लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यास उशीर झाला, अशी माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात लाडकी बहीणचा हप्ता देण्यास उशीर झाल्यानं विरोधकांकडून सरकारवर टीका केली जाते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटणार हे स्पष्ट झालंय. कारण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची पडताळणी करण्याचं काम महिला व बालविकास विभागाकडून सुरु करण्यात आलं. यापूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 9 लाखांनी घटली असल्याची माहिती आहे. या संख्येत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील 55 हजार अर्जदारांची नावं कमी झाल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार कोणत्या महिला पात्र आहेत कोणत्या महिला अपात्र याची पडताळणी महिला व बाल विकास विभागाकडून विविध विभागाच्या मदतीनं करण्यात येत आहे. योजनेच्या निकषानुसार ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील कमाल दोन महिलांना योजनेचा लाभ मिळेल. महिलेचं वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असावं. ज्या महिला शासनाच्या इतर थेट रक्कम मिळणाऱ्या योजनेचा लाभ घेणाऱ्या नसाव्यात. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा केवळ 500 रुपये दिले जातील. चारचाकी वाहन ज्या कुटुंबात आहे त्या कुटुंबातील महिला अपात्र ठरणार आहे. लाडकी बहीणच्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी करुन अपात्र लाभार्थ्यांचा लाभ बंद केला जात आहे.
इतर बातम्या :
अधिक पाहा..