शेअर बाजार: सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांक 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स 1 हजार 414 अंकांनी गडगडला असून, निर्देशांक 73 हजार 198 वर बंद झाला आहे. तर निफ्टी 420 अंकांनी आपटला आहे. निर्देशांक 22 हजार 125 वर बंद झाला आहे. आयटी, वित्त आणि ऑटो क्षेत्रातील समभागात मोठी घसरण झाली आहे.
फेब्रुवारी महिन्यात सेन्सेक्स निर्देशांक 4 हजार अंकांनी घसरला आहे. गुंतवणूकदारांचे जवळपास 40 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. चिपमेकर एनव्हिडियाच्या घसरणीमुळं अमेरिकेतील बाजार कोसळला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या करावरील ताज्या टिप्पण्यांनंतर गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. बिटकॉइनमध्ये देखील गुंतवणूकदारांची निराशा झाली आहे. 6 टक्क्यांनी कोसळत 79 हजार 214 डॉलरपर्यंत खाली घसरला आहे.
भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) गेल्या काही दिवसांपासून जोरदार घसरण सुरु आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं भारतीय बाजारातून पैसे काढून घेतले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेच्या (Indian Economy) वाढीचा वेग देखील मंदावला आहे. गेल्या सात तिमाहींपासून जीडीपीचा विकास दर अपेक्षेप्रमाणं दिसत नाही. भारतीय शेअर बाजार सातत्यानं कोसळत आहे. बाजारातील अस्थिर स्थितीचा विचार करता म्युच्यूअल फंड गुंतवणूकदारांकडून एसआयपी (Mutual Fund SIP) बंद करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांमध्ये विक्रीचं सत्र जोरदार सुरु आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल्याच्या दरात वाढ झाली आहे. याशिवाय अमेरिकेत रोजगाराच्या मजबूत आकडेवारीमुळं व्याजदरातील कपातीची शक्यता कमी झाली आहे. यामुळं डॉलर मजबूत झाला असून त्याच्या तुलनेत रुपया कमजोर झाला आहे. जीडीपीच्या दरातील कमतरता आणि कमाई कमी झाल्यानं बाजारावर परिणाम झाला. याशिवाय तिसऱ्या तिमाहीत कंपन्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणं न राहण्याचा अंदाज यामुळं शेअर बजारात घसरण सुरु आहे. शेअर बाजारात सोमवारी सलग चौथ्या दिवशी घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीसह स्मॉल कॅप, मिडकॅप शेअर्समध्येही घसरण झाली. यामुळं छोट्या गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. डॉलर मजबूत होणं, विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी त्यांचा पैसा भारतीय बाजारातून विक्री करुन काढून घेणं, डोनाल्ड ट्रम्प यांचं आर्थिक धोरण याचा प्रभाव बाजाराच्या घसरणीमागं असल्याचं सांगण्यात येत. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये आणखी घसरण होईल, असं सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..