घरकुल लाभार्थ्यांना
पहिला हप्ता वितरित
खेड ः केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यातील गुणदे येथील घरकुलासाठी पात्र ठरलेले लाभार्थी पहिल्या हप्त्यापासून वंचित होते. अखेर २०२४-२५ या आर्थिक वर्षातील प्रतीक्षा यादीतील घरकुल लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. योजनेंतर्गतच्या सर्व लाभार्थ्यांना घराचे मंजुरीपत्र रवींद्र आंब्रे, सोनाली आंब्रे, शिक्षणविस्तार अधिकारी श्रीधर शिगवण यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. शिगवण यांनी घरकुलाची रचना व काम ९० दिवसात काम पूर्ण करण्याचे आवाहन केले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. ग्रामपंचायत अधिकारी आरती मोरे यांनी घरकुल काम सुरू करताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले.
---
१० रेल्वेगाड्यांवर
ब्लॉकचा परिणाम
खेड ः मुंबई-सीएसएमटी येथील फलाट क्र. १२ आणि १३च्या कामासाठी मध्यरेल्वे या स्थानकावर या आठवड्यात एक ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे या स्थानकावरून सुटणाऱ्या काही गाड्यांच्या प्रारंभ आणि अंतिम स्थानकांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस १ मार्चला पनवेल येथून सुटेल. २ मार्चला सुटणारी मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस, तेजस एक्सप्रेस या गाड्या दादरवरून सुटणार आहेत. सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस पनवेल स्थानकावरून सुटणार आहे.
---
‘मराठा क्रांती’ची
भरणेत सभा
खेड ः मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या रत्नागिरी विभागाची सभा भरणे घडशीवाडी येथे झाली. सभेला रायगड जिल्हाध्यक्ष अरविंद पालांडे उपस्थित होते. संघटनावाढीच्यादृष्टीने सामाजिक हिताचे समाजाच्या अनेक प्रश्नावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रादेशिक कोकण विकास अध्यक्ष चंद्रकांत मोरे, जिल्हाध्यक्ष कृष्णा शेलार यांनी मार्गदर्शन केले. सभेत भरणे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व सफाई कर्मचारी शैलेंद्र जाधव, अनिल शिगवण, लक्ष्मण भिगारे, रमेश फागे, मंदार डोंगळे, दिनेश शिगवण, रोशन बाईत, शरद गोवळकर यांचा अॅड. सुधीर बुटाला यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी डॉ. प्रणय कासारे, भरणे पोस्टातील पोस्टमन अशोक पेवेकर यांचा सन्मान करण्यात आला.
---
शिवतरला ११ मार्चला
वाघजाई देवी उत्सव
खेड ः श्री वाघजाई देवी मित्रमंडळातर्फे शिवतर-खिंडवाडी येथे ११ आणि १२ मार्चला सार्वजनिक श्री वाघजाई देवी उत्सव व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ११ मार्चला सायंकाळी ६.३० वाजता दीपोत्सव, हरिपाठ, संगीतभजन व रात्री अन्नप्रसाद; १२ ला होमहवन व पूजा, सत्यनारायण महापूजा आणि आरती, सत्कार समारंभ, महाप्रसाद, देवीला गाऱ्हाणे, नवस व ओटी भरणे, सायंकाळी ४ वाजता वाघजाई देवीची पालखी मिरवणूक, रात्री १० वाजता भजन होईल.