-rat२८p२०.jpg-
२५N४८२४०
कन्याकुमारी : काश्मीर ते कन्याकुमारी सागरी महामार्गावरून सायकलवारी पूर्ण करणारे सायकलस्वार सतीश जाधव आणि सहकारी.
-------------
काश्मीर ते कन्याकुमारी सायकलवारी यशस्वीरित्या पूर्ण
सतीश जाधव ः प्रदूषणमुक्त भारताचा संदेश, रत्नागिरीत स्वागत
मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : प्रदूषणमुक्त भारताचा संदेश देत काश्मीर ते कन्याकुमारी सायकलवारी पूर्ण झाली आहे. मुंबईतील सायकलस्वार सतीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणखी चारजणांनी सायकलवारी पूर्ण केली. ते कन्याकुमारीला सुखरूप पोहोचले. त्यांनी ३९ दिवसांत एकूण ४१९८ किलोमीटर पूर्ण केले. काश्मीरपासून निघून प्रदूषणमुक्त भारत, प्लास्टिकमुक्त परिसर याबाबत जनजागृती त्यांनी केली. ५५ ते ६७ वयोगटातील या सायकलस्वारांनी हा एक जागतिक विक्रम केला.
मुंबईतील आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनचे पाच सायकलस्वार काश्मीर ते कन्याकुमारी (के टू के, सागरी महामार्गाद्वारे) १६ जानेवारी रोजी काश्मीरच्या लाल चौकातून सायकलस्वारीला निघाले. मुंबईतील सतीश जाधव (वय ६७) यांच्या नेतृत्वाखाली मंगल भानुशाली (वय ६४), मनोज चौगुले (वय ६२), जितेंद्र जैन (वय ५६) आणि जयंती गाला (वय ५५) हे या सायकलवारीत सहभागी झाले होते. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातूनही सागरी महामार्गावर प्रवास केला. त्या वेळी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने त्यांचे आदरातिथ्य केले होते. जाधव म्हणाले, काश्मीर ते कन्याकुमारी मार्गावर एकूण उंची (एलिव्हेशन) २४ हजार १३७ मीटरएवढी गाठली. एव्हरेस्टची उंची ८८४९ मीटर्स आहे म्हणजेच २.७ पट एव्हरेस्ट पार केला. गुगलवरून वर्कआऊट केलेल्या ४०४८ किमी अंतरापेक्षा १५० किमी जास्त अंतर पार केले. त्यासाठी एक दिवस जास्त लागला असता म्हणजेच ४१ दिवसांचे उद्दिष्ट ठेवावे लागले असते; पण हे उद्दिष्ट ३९ दिवसात पूर्ण केले आहे. दररोज ८० ते १५० किलोमीटर अंतर कापले. प्रत्येक ठिकाणी थांबलो तिथे चांगला पाहुणचार मिळाला. सर्व सायकलस्वारांनी मजेत, आनंदात आणि हसतखेळत हे अंतर पूर्ण केले आहे. काश्मीरनंतर पंजाब, राजस्थान, गुजरातमार्गे मुंबईत, कोकण किनारामार्गे गोवा, केरळ, तामिळनाडू आदी राज्यांतून प्रवास केला.
--
जागतिक विक्रम
प्रथमच काश्मीर ते कन्याकुमारी व्हाया सागरी महामार्ग अशी ही पहिली सायकलयात्रा होती. त्यामुळे एका नवीन जागतिक विक्रमाला गवसणी घातली. या मार्गाने ५५ ते ६७ वयाच्या वरिष्ठांनी सायकल चालवली. ही संपूर्ण राईड सर्व सामनासहित सेल्फ सपोर्टेड होती. शेवटच्या दिवशी २३ तासांत २३० किमी सायकलिंग करून कन्याकुमारी गाठले.
-----
दृष्टिक्षेपात
सायकलस्वार- ५
अंतर- ४१९८
दिवस- ३९
---------
कोट
स्वामी विवेकानंद स्मारकासमोर नतमस्तक झालो. या अभूतपूर्व सायकलवारीने खूप काही शिकवले. प्रचंड मित्रपरिवार जोडता आले. खूपजणांना सायकलिंगसाठी उद्युक्त करता आले. वेगवेगळ्या प्रांतातून पुढे पुढे जाताना वातावरणातील बदल स्वीकारत आलेल्या अडचणी शिकण्याची संधी समजून त्या सोडवत मार्गक्रमण करत राहिलो. सर्वांना सतत ऊर्जावान ठेवत शेवटच्या दिवशी २३० किमी राईड करून एक दिवस आधीच या प्रदूषणमुक्त भारतयात्रेची सांगता झाली.
- सतीश जाधव.