पुण्यातल्या स्वारगेट एसटी डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्ता गाडेला ७० तासांनंतर अटक करण्यात आली. दत्ताला त्याच्या शिरूरमधील गावातून अटक करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनेवेळी आरोपी दत्ता गाडे दोन तास स्वारगेट बसस्थानकात घुटमळत फिरत होता आणि सावज शोधत होता. सीसीटीव्हीच्या तांत्रिक विश्लेषणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दत्तात्रय रामदास गाडे हा मुळचा शिरूर तालुक्यातील गुनाट या गावचा आहे. तो विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. स्वारगेट बसस्थानक हा त्याचा सातत्याने फिरण्याचा परिसर असल्याची माहिती समोर आली आहे. दत्तात्रय गाडे हा फिरस्ता असून त्याचे कुटुंबीय ही त्याला कंटाळले होते. तो जास्त घरी नसतो, आला तर कधी तरीच येतो, अन्यथा येतही नाही, अशी माहिती दत्ता गाडेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे.
अटकेनंतर आज दुपारी २ वाजता आरोपी दत्ता गाडे याला न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. पुणे पोलिस दत्ता गाडेला दुपारी २ वाजता पुणे सत्र न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार पत्रकार परिषद घेण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. रात्री १.१५ वाजता दत्ता गाडेला पुणे पोलिसांनी शिरूरमधून अटक केली होती.
स्वारगेट बस स्थानकातील तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी दत्ता गाडेविरोधात यापूर्वी पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. शिक्रापूर पोलिस ठाण्यामध्ये त्याच्याविरोधात चोरीचे २ गुन्हे दाखल आहेत. शिरूर पोलिस ठाण्यामध्ये सुद्धा आरोपीविरोधात एक चोरीचा गुन्हा दाखल आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतवाली पोलिस ठाण्याला आरोपीविरोधात २ चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुण्यातील स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये मागील वर्षी एक मोबाईल चोरीचा गुन्हा देखील त्याच्या विरोधात दाखल आहे.