शलाका तांबे - लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक
आजच्या या वेगवान जगात, वर्क-लाइफ बॅलन्स म्हणजे काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचे संतुलन सांभाळणे प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक झाले आहे. हे संतुलन ठेवणे आव्हानात्मक असते, याचा अनुभव आपण सगळे घेतो. खासकरून स्त्रियांच्या दृष्टिकोनातून बघितले, तर वर्क-लाइफ बॅलन्स हे त्यांना अधिक कुशलतेने सांभाळावे लागते ही वस्तुस्थिती आहे. मग आज आपण या विषयाकडे, खास स्त्रियांच्या दृष्टिकोनातून बघूयात.
कौटुंबिक जबाबदाऱ्या, कार्यक्षेत्रातील- करिअरमधील गतिशीलता, आणि सामाजिक अपेक्षा, या तिन्ही आघाड्या सांभाळून वर्क-लाइफ बॅलन्स ठेवणे खरेच आव्हानात्मक असते. अर्थात पुरुषांनाही या तिन्ही आघाड्या सांभाळाव्या लागतात हे खरे आहे; पण या तिन्ही आघाड्यांवर, महिलांना अधिक सतर्कता दाखवावी लागते हेही खरे आहे.
कौटुंबिक आघाडीवर अजूनही, कुटुंबीयांच्या स्वास्थ्याची, मुलांच्या, मानसिक व भावनिक पालनपोषणाची आणि शारीरिक स्वास्थ्याची जबाबदारी प्रामुख्याने घरातील स्त्रीवर असते आणि ते नेटाने पार पाडण्याचा प्रयत्नही ती करत राहते. मग सगळे काही परफेक्ट झाले पाहिजे या प्रेशरमध्ये तिची ओढाताणही होते.
आजदेखील, बहुतेक घरांमध्ये, नातेसंबंध, सामाजिक संबंध, सांस्कृतिक वारसा, कौटुंबिक परंपरा, हे सगळे काही सांभाळण्याची अपेक्षा स्त्रीकडून जास्त असते. त्यांना ‘नैसर्गिकरित्या हे जास्त चांगले जमते’ हा मुद्दा त्यात असतो आणि हे सगळे त्या स्त्रीला सहज जमावे अशी अव्यक्त अपेक्षाही असते.
कार्यक्षेत्रात आणि करिअरमध्ये, बहुतेकवेळेला, पुरुषप्रधान कार्यशैलींमुळे, स्त्रियांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात. आज यात बदल होत आहे; पण तरीही अजून बराच बदल येणे बाकी आहे. त्यामुळे कामाचे प्रेशर आणि तिथेही सगळे काही परफेक्ट करण्याचे प्रेशर स्त्रिया जास्त अनुभवतात.
पण आयुष्यात सुख आणि समाधान अनुभवायचे असेल, तर ‘काम’ आणि ‘आयुष्य’ या दोन्हीचा आनंद घेता यायला हवा. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या काम आणि आयुष्य संतुलन साधण्यात मदत करतील? हे जाणून घेऊ.
करिअर आणि वैयक्तिक ध्येयांचा ताळमेळ : वैयक्तिक जीवनातील इच्छा, आणि करिअरमधील ध्येये, यामध्ये ताळमेळ असेल, तर वर्क-लाइफ बॅलन्स ठेवणे थोडे सोपे होऊ शकते. आपल्या प्राधान्यांचे आकलन करून त्याप्रमाणे वेळोवेळी आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्याचा आढावा घ्या, त्याचा ताळमेळ कसा बसेल हे बघा. अशा संभाषणासाठी आणि विचारांसाठी जाणीवपूर्वक वेळ काढा आणि ते कसे घडवून आणता येईल यांवर फोकस करा.
आपल्या मर्यादांचा आदर करा : स्वतःच्या डोक्यावर सगळे ओझे वाहणे आणि मला हे जमलेच पाहिजे असा थोडा अट्टाहास असणे या एका सवयीमुळे स्त्रियांवर बऱ्याच वेळा दबाव येतो. आपल्या मर्यादा मान्य करून, त्या कुटुंबीयांबरोबर मोकळेपणाने शेअर करणे खूप आवश्यक आहे. बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना आपली खूप ओढाताण होतीये हे माहीतच नसते- कारण आपण ते सहसा कुणाला सांगतच नाही. मग हे सांगण्याची सवय करा. कामाच्या ठिकाणीसुद्धा हे धोरण ठेवून, आपल्या कामाचा आपल्यावर अनैसर्गिक ताण येत नाही याची काळजी घ्या. आपला दृष्टिकोन आणि गरजा, योग्यरित्या communicate करा.
अपराधगंड टाळा : आपल्यावरच्या अनेक जबाबदाऱ्यांमुळे, अनेक वेळा असे होते, की कामाच्या ठिकाणी घरच्या गोष्टींच्या चिंता करतो, आणि घरी असताना, कामाच्या विचारांनी विचलित होतो. कारण मला सगळीकडे योग्य न्याय द्यायचा आहे हा विचार कुठेतरी आपल्या मनात असतो, आणि त्याचबरोबर मी खरेच दोन्हीकडे न्याय देते आहे का? ही शंकाही वाटत राहते. या guilt trap मध्ये न पडता, ‘मी आत्ता जिथे आहे तिथे मी पूर्णपणे आहे,’ याची जाणीव ठेवा. त्याचा आनंद घ्या.
वेळेचे नियोजन : वेळेचे नियोजन हे कौशल्य प्रत्येक स्त्रीने जाणीवपूर्वक शिकले पाहिजे. महिलांना ‘natural multitaskers’ म्हणून दर्शविले जाते; पण मल्टि-टास्किंगपेक्षा, ‘टायमिंग युवर टास्क्स’ जास्त महत्त्वाचे आहे हे समजून घ्या. आपला वेळ कधी, कुठे आणि कसा गेला पाहिजे याचे नियोजन करा. जाणीवपूर्वक वेळेचे नियोजन केल्यास तुम्हाला स्वतःसाठी, घरच्यांसाठी, तुमच्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढणे जमू शकेल. कारण संतुलन म्हणजे काय? तर आयुष्यातील महत्त्वाच्या पैलूंना वेळ देता येणे आणि त्याचा आनंद घेता येणे - एवढी त्याची साधी सोपी व्याख्या होऊ शकते. त्यामुळे वेळेचे नियोजन हे कौशल्य जरूर आत्मसात करा.
‘वर्क-लाइफ बॅलन्स’ हा एक दृष्टिकोन बनवावा लागतो, एक जीवनशैली बनवावी लागते आणि यासाठी सातत्याने प्रयत्नही करावा लागतो. मग ‘मानसभान’ ठेवून तुम्ही तुमच्या काम आणि आयुष्याच्या संतुलनासाठी यातील कोणत्या गोष्टी अमलात आणाल, हे जरूर ठरवा.