राजीव तांबे - साहित्यिक, बालमानसविषयक तज्ज्ञ
मुलांना जंक फूड आवडतं की नाही? मुलं जंक फूडसाठी हट्ट करतात की नाही? घरी केलेलं काही खाण्यापेक्षा त्यांना जंक फूडच खायचं असतं का?... या सर्व प्रश्नांची उत्तरं ‘तुमच्या घरातील वातावरण कसं आहे’ यावर अवलंबून आहेत.
यासाठी आधी दोन प्राथमिक मुद्दे समजून घेऊ. कुठल्याही गोष्टीला विरोध केला, तर त्या गोष्टीविषयीचं आकर्षण वाढतं. इतकंच नव्हे तर विरोध जेलढा तीव्र असेल तेव्हा आकर्षणही तेवढंच अधिक असेल. दुसरं म्हणजे पालकांची उक्ती आणि कृती विसंगत असेल, तर त्याचा फायदा मुलं बरोबर घेतात. म्हणजे जंक फूड वाईट असतं असं सांगायचं; पण ‘आज मी घाईत आहे. मला वेळ नाही म्हणून मी तुला जंक घेऊन देतो/देते’, अशी बोटचेपी भूमिका घेतली की, पुढे मुले याचा व्यवस्थित गैरफायदा घेऊ शकतात किंवा बहुधा घेतात.
जंक फूड आवडण्याची अनेक कारणं आहेत. किंबहुना हे पदार्थ आणि त्याचं पॅकिंग, त्यावरील रंगसंगती, त्याच्या जाहिराती ग्राहकांना आवडतीलच आणि लगेच आकर्षित करतीलच याप्रमाणे बनवलेल्या असतात. त्यामुळे हा मुद्दा सध्या बाजूला ठेवू. आणि ‘मुलांना जंक फूडची सवय लागू नये यासाठी काय-काय करता येईल?’ या मुद्याचा विचार करूया.
सध्या तीन उपाय सुचवितो. आधी सांगितल्याप्रमाणे जंक फूडला पूर्णत: विरोध न करता, हे पदार्थ खाण्याचं प्रमाण हळूहळू कमी करत न्यायचं आहे. यासाठी प्रथम आठवड्यातला एक वार ठरवायचा. फक्त याच दिवशी वेफर्स किंवा तत्सम पदार्थ खाता येतील. इतर दिवशी अजिबात नाही. दुसरा सोपा उपाय म्हणजे वेगवेगळ्या रेसिपी बनवण्यात मुलांचा सहभाग घ्यायचा. यावेळी आपण मसाले कुठले वापरतो आणि का वापरतो? आपण तेल कुठलं आणि का वापरतो? मिठाचं प्रमाण किती असतं?, याविषयी मुलांशी बोलायचं आहेच; पण त्यांच्या मदतीने नोंदीही करायच्या आहेत. विशेषत: आपल्या घरात तयार होणाऱ्या पदार्थात किती पोषणमूल्यं आहेत हे गुगलच्या मदतीनं शोधायचं, मांडून ठेवायचं. यानंतर जेव्हा आपण आठवड्यातून एकदाच वेफर्स किंवा तत्सम जंक फूड आणणार आहोत, तेव्हा त्याच्या पाकिटावर दिलेले घटक पदार्थ पाहायचे आणि ते आपल्या घरातल्या पदार्थांशी ताडून पाहायचे.
नंतर दोन मुख्य गोष्टी करायच्या. एक. घरी केलेला पदार्थ खूप दिवस टिकावा म्हणून आपण त्यात कुठलेही रासायनिक किंवा घातक पदार्थ मिसळत नाही, कारण आपण ताजं खातो; पण हवाबंद पिशवीत मिळणारे पदार्थ टिकाऊ होण्यासाठी त्यात मिसळलेले रासायनिक पदार्थ किती घातक आहेत हे सहजं शोधता येतं. (याबाबत आपल्या डॉक्टरांचा सल्लाही घेता येईल) दुसरं म्हणजे, जंक फूडमधील घटक पदार्थ आणि पोषणमूल्यं यांचं व्यस्त प्रमाण. मुलांच्या मदतीनं आपण हे शोधायला सुरुवात करतो, तेव्हा ‘हे पदार्थ का खाऊ नयेत?’ हे मुलांना वेगळं सांगावं लागत नाही आणि तरीही आपण त्यांना आठवड्यातून एकदा खाण्याची मुभा देत आहोत यामुळे मुले नाराजही होत नाहीत.
तिसरा उपाय सोपा असला, तरी थोडा आव्हानात्मक आहे. ‘चमचमीत किंवा मसालेदार खायला काहीच हरकत नाही; पण घटक पदार्थांचा दर्जा आणि पोषणमूल्यं यांबाबत कुठलीही तडजोड करायची नाही आणि पदार्थ टिकाऊ होण्यासाठी कुठलाही रासायनिक पदार्थ वापरायचा नाही’, याची स्पष्ट जाणीव मुलांना करुन द्यायची. आपण घरीच करूया का वेफर्स? तू शोधशील का नवीन रेसिपी? तू करशील का? आपण तुझ्या आवडत्या पदार्थांचं रेसिपी बुक तयार करूया का? मुलांना त्याच्या आवडीचा वेगळा पदार्थ तयार करायला प्रोत्साहित करा. स्वयंपाकघरात थोडं स्वातंत्र्य द्या. त्यांनी केलेले नवीन पदार्थ चवीनं खात त्याचं कौतुक करा. विश्वास ठेवा, मग मुलं स्वत:हूनच जंक फूडच्या वाट्याला जाणार नाहीत.
‘जेव्हा घरातलं किचन सर्वांचं होतं, तेव्हा जंक फूड घरातून पळ काढतं’ ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल.