पुणे : स्वारगेट एसटी बस स्थानकात शिवशाहीमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम दत्तात्रेय गाडेला गुनाटच्या (ता. शिरूर) ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता. २८) पहाटे सव्वाच्या सुमारास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर स्वारगेट पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने तक्रार दिल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी बस स्थानकातील २३ सीसीटीव्ही कॅमेरे आणि बाहेरील ४८ तास कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले. आरोपीची दीड तासातच ओळख पटली. त्याच्यावर स्वारगेट ठाण्यात २२ जानेवारी २०२४ ला मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होता. त्या संशयिताचे छायाचित्र पीडित तरुणीला दाखविल्यानंतर आरोपीची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या मदतीने केलेल्या तपासात आरोपी गाडे हाच असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर २०१९ मध्ये अहिल्यानगर आणि पुणे ग्रामीणमध्ये सहा गुन्हे दाखल आहेत.
गुनाटमध्ये पोलिसांचा फौजफाटाआरोपी निष्पन्न झाल्यानंतर पोलिस गुनाटमध्ये दुपारी दोनच्या सुमारास पोहोचले. परंतु, आरोपी हाती लागला नाही. त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची पथके, परिमंडळ दोन, स्वारगेट, पुणे ग्रामीण आणि मुख्यालय, असे सुमारे पाचशे अधिकारी व कर्मचारी गावात तीन दिवसांपासून तळ ठोकून होते. आरोपी पळून जाऊ नये, यासाठी उसाच्या शेतीसह बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. ही पुणे पोलिस दलाची संयुक्त कामगिरी आहे. सुमारे चारशे-पाचशे ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले. श्वान पथकाने आरोपी उसात लपून बसलेली दोन-तीन ठिकाणे दाखवली. तसेच, थर्मल ड्रोनच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आला.
पोलिस आयुक्तांकडून ग्रामस्थांचे आभार :गुनाटमधील ग्रामस्थांनी आरोपीला पकडण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याला शुक्रवारी पहाटे एक वाजून दहा मिनिटांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे आयुक्तांनी ग्रामस्थांसह पोलिसपाटील, सरपंचांचे आभार मानले. तसेच, पोलिसांना मदत करणाऱ्या गावकऱ्यांची भेट घेणार असून, त्यांचा सत्कार करणार असल्याचे सांगितले.
महिलांच्या सुरक्षिततेबाबत आढावा :महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून एसटी बस स्थानक, रेल्वे स्थानक, हॉटस्पॉट, टेकड्यांचा परिसर, निर्जन स्थळांच्या ठिकाणांचा सुरक्षा आढावा घेण्यात येत आहे. ‘कॉप २४’ पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार असून, क्यूआर कोड मॅपिंग करण्यात येणार आहे. महापालिकेच्या मदतीने पथदिव्यांची संख्या वाढविण्यासह उपाययोजना करण्यात येत आहेत, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
न्यायालयात काय घडले?आरोपी गाडेला शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास न्यायालयात हजर केले. त्याने तरुणीचा गळा दाबून अत्याचार केला. हा गुन्हा गंभीर असल्याने त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी मिळणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी केला. तसेच, आरोपीचे कपडे, मोबाईल जप्त करावयाचा आहे. आरोपीवर इतर गुन्ह्यांची माहिती, या गुन्ह्यात इतर साथीदार होते का? फरार असताना त्याला कोणी सहकार्य केले? याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
महिलेचे कपडे जप्त केले आहेत. सीसीटीव्हीत तरुणी स्वत:हून बसमध्ये चढली. त्यापाठोपाठ आरोपी चढला, असे सांगत घटनेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. तसेच, तरुणीने आरडाओरडा केलेला नाही, हा प्रकार सहमतीने झाल्याचे सांगितले. आरोपीचा प्रसारमाध्यमांत चेहरा दाखवल्याने परेडचा प्रश्न राहत नाही. आरोपीवर असलेले गुन्हे सिद्ध नाहीत. त्यामुळे सराईत म्हणता येणार नाही. त्यामुळे दोन दिवसांची कोठडी पुरेशी असताना १४ दिवस कोठडीची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद करत आरोपीच्या वकिलांनी कोठडीस विरोध केला. त्यावर न्यायालयाने आरोपीला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पुढील सुनावणी १२ मार्च रोजी होईल.
आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न फसलापोलिस आणि ग्रामस्थ त्याच्या मागावर असल्याचे आरोपीला समजले. त्याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु, दोरी तुटल्यामुळे तो वाचला. प्राथमिक वैद्यकीय तपासणी अहवालात त्याच्या गळ्यावर व्रण असल्याचे दिसले.
खटला जलद गती न्यायालयातप्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक नेमले असून, सबळ पुरावे गोळा करण्यात येत आहेत. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात येणार असून, विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात येणार आहे.