“तीन तारखेला पुरवणी मागण्या मांडल्या जातील. हे बजेट अधिवेशन आहे. कामकाज सल्लागार समितीने 10 तारखेला अर्थसंकल्प सादर करण्यास मान्यता दिली आहे. केंद्राने जसा सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, तसच आमचं सरकार सुद्धा त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतेय. बजेट ज्या दिवशी मांडणार त्या दिवशी चित्र स्पष्ट होईल” असं अजित पवार म्हणाले. एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते. ते म्हणाले की अजित पवारांच्या पुण्यात भगवा झेंडा फडकावयचा आहे. त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं.
“तुम्ही लावालाव्या करायचं बंद करा. हे असले धंदे बंद करा. खऱ्या बातम्या द्यायला शिका. एकदा पोलिसांचा रिपोर्ट येऊ द्या. मग काय घडलं ते समजेल. काही जण इतका उतावीळपणा दाखवतात की, माहिती घेण्याआधी न्यूज देतात. इतका अतातयीपणा चांगला नाही. सबुरीने घेतलं तर बरं होईल” असं अजित पवार म्हणाले.
‘एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेत आहेत’
“महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय. त्याचबरोबर प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेत आहेत, ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात. देवेंद्र फडणवीस साहेब गेले तर ते भाजपचा झेंडा रोवायचा आहे असं सांगणार. मी गेलो तर, राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे असं सांगिन” असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांकडून सबुरीचा सल्ला कोणाला?
“आम्ही एकजुटीने रहायचं असं ठरवलं आहे. आम्ही काही बोललो, तरी जनता-जनार्दनाच्या हाती सर्वकाही आहे. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात. पत्रकारांना सबुरीचा सल्ला देताना, माझ्यासकट सगळ्यांना हा सबुरीचा सल्ला आहे” असं अजित पवार म्हणाले.
14 लाख विद्यार्थींची तपासणी
“आरोग्य मंत्री यांनी स्तुत्य उपक्रम राबविला त्यांचे कौतुक. परिवाराचे आरोग्य चांगले आहे का नाही हे पाहण्यासाठी आरोग्य तपासणी महत्वाची. फुले, शाहू, आंबेडकर विचारांच्या महाराष्ट्रात जन्माला आलेलं मुलं सुदृढ असली पाहिजेत. कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे यावर सुद्धा कशी लस देता येईल याचा विचार आम्ही करत आहोत. शालेय मुलांच्या पायाच्या नखांपासून केसांपर्यंत सर्व आरोग्य तपासणी करणार आहोत. बाल स्वास्थ कार्यक्रम राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यातील 14 लाख विद्यार्थींची तपासणी केली जाणार आहे” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.