प्रतीक्षा शिवणकर - अभिनेत्री
आपल्यासाठी आईचं अस्तित्व असणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळेच आई माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे आई का महत्त्वाची आहे, यापेक्षा आई माझ्या आयुष्यात असणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आईमुळे आमच्या कुटुंबात खूप बदल घडले. माझ्या आईला शिक्षणाची भयंकर गोडी आहे. मी एमए करत होते, त्याचवेळी आईनंसुद्धा तिचं एमए पूर्ण केलं. मला नाटकात अभिनयाची संधी मिळाली होती. त्यामुळे मला दुसरं वर्ष पूर्ण करता आलं नाही; पण तिनं तिचं एमए पूर्ण केलं. त्यामुळे आमच्या कुटुंबात आईमुळेच शिक्षणासह इतर बाबतीतही ठरवलेली गोष्ट अगदी मन लावून आणि चिकाटीनं १०० टक्के पूर्ण करण्याची सवय लागली आहे. कुठल्या गोष्टीला वयाचं बंधन नसतं, हा एक मोठा बदल आमच्या कुटुंबात झाला आहे. आपली मोठी आई कशी वागते, त्यानुसार आमचं घर, आमच्या काकांच्या कुटुंबात बदल होत आहेत. आमच्या आईचे गुण सर्वच कुटुंबात घेतले जातात. तिच्या कर्तृत्वाने आमचं कुटुंब उच्चशिक्षित झालं असून त्यामुळे खूप बदल घडले आहेत.
माझ्या आईमुळेच मला अभिनयाची गोडी लागली. तिला बघत-बघतच मी मोठी झाले. माझी आई भारती शिवणकर शिक्षिका आहे. त्यांच्या शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्यामध्ये ती उत्स्फूर्तपणे सहभागी होते. छोट्या-छोट्या कार्यक्रमांमध्ये ती गायनही करते. शिक्षक म्हणजे फक्त शिकवणं, असं नसून तिला अनेक गोष्टींची गोडी आहे. ती उत्कृष्ट कबड्डीपटू आणि व्हॉलिबॉलपटू आहे. त्याचबरोबर ती उत्तम गाते, उत्तम नृत्यही करते. तिचं भाषेवर प्रभुत्व आहे. त्यामुळे ती व्यासपीठावर विविध कार्यक्रमांच्या वेळी खूप छान बोलते.
त्यामुळे तिचे हे सगळे गुण माझ्यात आणि माझ्या बहिणीत अगदी लहानपणापासून रुजायला सुरुवात झाली होती. व्यासपीठावर कसे बोलायचे, हावभाव कसे करायचे, आवाजामध्ये चढ-उतार केव्हा करायचा, या सर्व गोष्टी ती आम्हाला सांगते. त्यामुळेच माझ्यातही स्टेज डेअरिंग आली आहे. मला या सगळ्या गोष्टींची गोडी अन् आवड आईमुळेच लागली. विविध छंद जोपासण्याची गोडी आईमुळेच लागली. विशेष म्हणजे माझ्या अभिनयाचं श्रेयही आईला जातं. कारण मी तिलाच बघत मोठी झाले आहे.
संयम हा माझ्या आईचा गुण माझ्यात यावा, असं मला नेहमीच वाटतं. कारण ती खूप संयमी आहे. आयुष्यात कुठलीही परिस्थिती येऊ दे, ती त्या परिस्थितीचा सामना करते. चांगली परिस्थिती आली तरी ती हरखून जात नाही आणि खूप वाईट परिस्थिती आली, की ढासळून जात नाही. ती नेहमीच तटस्थ असते. आलेल्या अडचणींचा किंवा चांगल्या परिस्थितीचा ती पहिल्यांदा विचार करते आणि त्यानंतर ती त्यावर व्यक्त होत असते. खरंतर आयुष्याला दिशा देणारा हा गुण माझ्यात नाही आहे. तो मला हवा आहे. माझ्याबाबतीत एखादी गोष्ट चांगली झाली किंवा एखादी गोष्ट वाईट झाली तरी मी गोंधळते; पण तिच्यातला हा गुण मला घ्यायचा आहे.
माझ्या आईला उत्कृष्ट कामाबद्दल ‘आदर्श शिक्षिका जीवनगौरव पुरस्कार’ मिळणार होता. हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर इथं होता. आईला पुरस्कार मिळणार म्हटल्यावर या आनंदाच्या क्षणी मला तिथं जायचे होते. त्यात मी अभिनेत्री असल्यानं या पुरस्काराची खूप चर्चा झाली. तरीही संयोजकांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं. विशेष म्हणजे हा पुरस्कार माझ्याच हस्ते आईला देण्यात आला. हा प्रसंग आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण ती फक्त माझी आई नसून ती माझी गुरू आहे, मेन्टॉर आहे, माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहे. अशा सगळ्याच गोष्टी एकाच व्यक्तीत आपल्याला सापडतात आणि अशा व्यक्तीचा वयानं लहान असूनही सत्कार करण्याची संधी मला मिळणं, हे मी कधीच विसरू शकत नाही. या सत्कार समारंभावेळी माझ्यासह आईही खूप भावनिक झाली होती. तिला अभिमान वाटत होता, की मुलीच्या हस्ते पुरस्कार मिळतोय. खरंतर हा प्रसंग माझ्या हृदयात कायमस्वरूपी कोरून ठेवला आहे.
सध्या मी ‘झी टीव्ही’वर ‘तुला जपणार आहे’ या मालिकेत अंबिकाचं पात्र साकारत आहे. ही मालिका माझ्याकडून १०० टक्के फक्त माझ्या आईसाठीच आहे. या मालिकेत मी पहिल्यांदाच आईची भूमिका साकारत आहे. त्यामुळे आपल्या बाळाबद्दलची तळमळ, बाळावर संकट आलं तर आई काय करू शकते, बाळ हसतं तेव्हा आईला किती आनंद होतो, या गोष्टी मी समजू शकते. प्रत्येक प्रसंगात भूमिका साकारताना मला माझी आई आठवते. आई ही गोष्टच जगात खूप सुंदर आहे. प्रत्येक ठिकाणी देव पोहोचू शकत नाही म्हणूनच त्याने आईला पाठवलंय. तिच्याशिवाय मी माझ्या आयुष्याचा विचारच करू शकत नाही. कारण ती माझं दैवत आहे.
(शब्दांकन : दीपिका मुराई)