वन डे मराठी..!
esakal March 01, 2025 01:45 PM

नअस्कार! वंदे मराठी लिहिण्याच्या नादात ‘वन डे मराठी’ असं मी लिहून बसल्ये…असंच वाटलं असेल नं तुम्हालाही? पण नाही, मी वन डे मराठी असंच मुद्दाम लिहिलंय. ओन्ली वन डे मराठी असंच लिहिणार होते, पण टायटलमध्ये नीट बसत नव्हतं…

कालचा दिवस भयंकर धावपळीचा गेला. मायमराठीच्या पुळक्यानं अवघा महाराष्ट्र भरुन वाहात होता. बाई, येवढं कुठलं ऊतू चाललंय मराठीचं प्रेम? असं वाटून मी शेवटी घराबाहेर पडलेच. फिरता फिरता मुंबईत पोचल्ये. मुंबईला गेलं की शिवाजी पार्कावर प्रकाशचा साबुदाणावडा आधी पोटात भरायचा, आणि मग पुढच्या कामाला लागायचं, असं ठरवून मी शिवाजी पार्कच्या पेट्रोल पंपापाशी पोचणार, एवढ्यात प्रचंड गर्दी दिसली. आश्चर्य म्हणजे सगळीच्या सगळी गर्दी मराठीत बोलत होती.

आमचे साहेब (एकच तर आहेत..) श्री. रा. राजसाहेबांनी तिथं (जगातलं) सर्वात भव्य मराठी पुस्तक प्रदर्शन लावलंय. दोन मार्चपर्यंत उघडं आहे. (बऱ्या बोलानं) जाऊन या!

साहेबांना मराठीचं किती प्रेम आहे. मराठी भाषा गौरव दिवस त्यांनी दिवाळीसारखा साजरा केला. तसा सगळ्याच नेत्यांनी तो साजरा केला. काही च्यानलांवर तर मराठी नेत्यांनी मराठी कविता वाचून दाखवल्या. राजसाहेबांचे चुलतबंधू उद्धवजींनी (बांदऱ्याला राहतात…) विंदा करंदीकरांची कविता म्हणून गुरु ठाकुरांची कविता वाचून दाखवलीन! काही हरकत नाही. मराठी कविता कुणीही केली तरी ती शेवटी मराठी कविताच. लग्नात मंगलाष्टक बापटकाकूंनी म्हटलं काय, आणि संध्यावन्संनी म्हटलं काय, एकच असतं….

राजसाहेबांच्या कविसंमेलनात मात्र १७ नामांकितांनी कविता वाचन ‘करुन दाखवलं’! खुद्द राजसाहेबांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदऱ्यांचं छत्रपती शिवरायांवरील ‘कोण रे तूं?’ हे कवन वाचून दाखवलं…

‘कोण रे तू? कालिकेचे खड्ग तूं? की इंदिरेचे पद्म तू?..’ असे प्रश्न करत शिवरायांची अद्वितीय, अमोलिक प्रतिमा डोळ्यांसमोर उभी करणारं हे कवन मुळात अद्भुत आहे. मराठी भाषा गौरव दिनाला इतकी अचूक कविता दुसरी नसेल.

त्यानंतर अनेक नामांकितांनी भराभरा कविता म्हटल्या. महेश मांजरेकर म्हणू नका, रितेश देशमुख म्हणू नका, सोनाली बेंद्रे म्हणू नका…पण यातही ब्लॉकबस्टर परफॉर्मन्स दिला तो अवघ्या तरुणाईच्या हृदयींचा छावा असलेल्या विकी कौशलनं. त्यानं कुसुमाग्रजांची ‘ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी’ हे अप्रतिम सुनीत इतकं सुंदर वाचलं की मी बाई च्याटच पडल्ये!

खिशाकडे हात जाताच

हसत हसत उठला,

पैसे नकोत सर,

जरा एकटेपणा वाटला,

मोडून पडला संसार

तरी मोडला नाही कणा,

पाठीवरती हात ठेवून

नुसतं लढ म्हणा!’

…या ओळी म्हणताना विकी कौशलचाही हात नकळत खिशाकडे गेला! एखाद्या नाटकाचा प्रवेश उलगडावा तशी त्यानं कविता समजून उमजून उलगडली. अशोकमामा सराफांनीही एक कविता म्हटली. कविता वाचणारे सगळेच नामांकित होते, जे नव्हते, ते यापुढे सर्टिफाइड नामांकित मानले जातील यात शंका नाही! असो.

ख्यातनाम साहित्यिक, शायर जावेद अख्तर यांनी स्वत:चीच ‘वक्त’ ही कविता ऐकवली. काळाचं गूढ-गहन वहन त्यांनी असं काही शब्दात पकडलं की, स्थलकालाचं परिमाणच नष्ट व्हावं…

…त्याआधी ’भाषा’ या विषयावर आमच्या मराठी लोकांची जरा कानउघाडणी करा, असं साहेबांनी त्यांना सांगितल्यामुळे त्यांनी पाच-दहा मिनिटं तेही काम पार पाडलं. म्हणाले, ‘‘ इतनी धरोहर, इतना खजाना आप के पास है, तो इतनी अनसुनी क्यों?’’ या त्यांच्या सवालाला मराठी माणसानं काय उत्तर द्यायचं?

वंदे मराठी! वन डे मराठी!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.