विरोधी पक्ष नेते पदासाठी अद्याप अर्जच नाही !
esakal March 01, 2025 01:45 PM

विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही!
मृणालिनी नानिवडेकर : सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. २८ : नव्याने निवडून आलेल्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन दिवसांवर आले असले तरी विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप कुणाचाही अर्ज दाखल झालेला नाही. विधान मंडळातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या विरोधी बाकांवरील एकाही सदस्याने अद्याप विरोधी पक्षनेतेपद आम्हाला द्यावे, अशा तऱ्हेचा पत्रव्यवहार केलेला नाही किंवा कोणत्याही प्रकारची चर्चाही झालेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली लोकसभेच्या निकालानंतर विरोधी पक्षांकडे पर्याप्त संख्या नसल्याचा राजकीय पवित्रा घेतला होता. त्यावेळी तत्कालीन लोकसभा विरोधी पक्षनेत्याविना होती. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकातील या वेळच्या राजकीय निकालानंतर केंद्रातील २०१४च्या राजवटीप्रमाणे त्याच धर्तीवर वागत विरोधी पक्षनेतेपद कोणालाही दिलेच जाणार नाही की काय, अशी शंका घेतली जाते आहे. अर्थात महाराष्ट्रात विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्येचा निकषच नाही. संसदीय लोकशाहीच्या सुविहीत नियमनासाठी विरोधी पक्षनेता हवा, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षरीत्या व्यक्त केले; मात्र आता ३ मार्चपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या आधी विरोधी दलात याबाबत एकमत होते काय, याकडे लक्ष लागले आहे.

आकडेवारीनुसार विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्वाधिक म्हणजेच २१ आमदार आहेत. काँग्रेसचे १६ सदस्य निवडून आले आहेत तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा जण निवडून आले आहेत. विरोधी बाकांवरील सर्वाधिक संख्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची असल्यामुळे ते या पदावर दावा करतील, यासंदर्भात युवा नेते आदित्य ठाकरे यांचे नाव चर्चेत आले होते; मात्र त्यांना सध्या ही जबाबदारी घ्यायची नाही तर राज्यात पक्षबांधणी करायची आहे, असे पक्षात बोलले जाते.

जाधव की प्रभू
ज्येष्ठ नेते भास्कर जाधव की सुनील प्रभू असा निवडीबाबत तिढा आहे, असे बोलले जाते. भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांना हे पद हवे आहे. आपल्याला पात्रतेप्रमाणे काहीच मिळाले नसल्याचे त्यांची तक्रार त्यांनी जाहीररीत्या व्यक्त केली आहे; मात्र मुंबई महापालिकेच्या संभाव्य निवडणुका लक्षात घेता या शहरातील अस्तित्व आणि ताकद टिकवून ठेवण्यासाठी येथे महापौरपदाची जबाबदारी निभावलेल्या सुनील प्रभू यांना विरोधी पक्षनेते केले जावे, असा एक मतप्रवाह आहे. प्रभू हे निष्ठावान आहेत तर जाधव काही काळासाठी शिवसेना सोडून गेले होते, याकडेही लक्ष वेधले जाते.

दरम्यान, विधानसभेत शिवसेनेला विरोधी पक्षनेते पद हवे असेल तर विधान परिषदेत आम्हाला संधी द्या, अशी चर्चा काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये सुरू आहे. काँग्रेसमुळे ठाकरे गटाला मते हस्तांतरित झाली, असेही सांगितले जाते. अंबादास दानवे हे सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असून ते अत्यंत आक्रमकपणे ही कामगिरी उत्तमरीत्या निभावतात, अशी ही राजकीय वर्तुळात चर्चा असते. काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.