‘‘वैद्यकीयनगरी म्हणून सांगली-मिरजेचा जगात नावलौकिक आहे. इथली माणसंही तितकीच प्रेमळ आहेत. हे प्रेम माझ्या वाट्याला आल्याने मी ‘श्रीमंत’ झाले."
सांगली : ‘‘सांगली खूप चांगली असून, ती थोरामोठ्यांनी वैभवशाली बनवली आहे. सांगलीकरांच्या पाठबळामुळेच साहित्य संमेलनाच्या प्रमुखपदाचा मुकुट मिळाला. सांगलीने दिलेले प्रेम व जपलेला जिव्हाळा हेच माझे ‘टॉनिक’ आहे. इथल्या कसदार मातीत अनेक सद्गुण असून मला तर ती ‘कॅप्सुल’प्रमाणे उपयोगी पडते आहे,’’ असे भावस्पर्शी उद्गार लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉ. तारा भवाळकर (Dr. Tara Bhawalkar) यांनी येथे काढले.
येथील श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टतर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारा जनसेवा पुरस्कार (Janseva Award) यंदा ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांना ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. ५० हजार रुपये रोख, मानचिन्ह, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ. भवाळकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘‘सांगलीकरांकडून झालेला हा सन्मान पायातील बळ वाढवणारा आहे. ५५ वर्षांपूर्वी भावाला शैक्षणिक प्रवेशासाठी सांगलीत आले आणि सर्वत्र फिरून सांगलीतच रमले. स्वतः शिकत असतानाच इतरांना शिकवण्याची संधी मिळाली. जन्म मुळा-मुठा नदीकाठचा, ‘गोदा’काठच्या नाशकात बालपण गेले. सांगलीच्या ‘कृष्णा’काठावर आल्यानंतर मधल्या काळात ‘कावेरी’काठावर गेले. आता संमेलनाच्या निमित्ताने ‘यमुना’काठी दिल्लीत जाऊन आले. हा सप्तसिंधू योग वाट्याला आला.
आयुष्यातील उत्तरायणाच्या टोकावर अपघाताने अध्यक्षपद मिळाले. अध्यक्षपदाची निवडणूक बंद झाल्याने, थेट निवड प्रक्रिया असल्याने कदाचित ही संधी मिळाली असावी. तमाम मराठी भाषिकांसह अभिजात दर्जा देण्यासाठी धडपडणाऱ्यांचा हा सन्मान आहे. संवादाचा पूल म्हणून भाषेकडे पाहिले पाहिजे. भाषेमुळे समाज एकत्र येऊन आपुलकीचा पूल जोडला जातो. शिक्षणाने माणूस साक्षर बनतो, तो शहाणा बनावा, ही अपेक्षा असते. शिकून शहाणपण येतेच ,असे नाही.’’
डॉ. भवाळकर म्हणाल्या, ‘‘वैद्यकीयनगरी म्हणून सांगली-मिरजेचा जगात नावलौकिक आहे. इथली माणसंही तितकीच प्रेमळ आहेत. हे प्रेम माझ्या वाट्याला आल्याने मी ‘श्रीमंत’ झाले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाल्यानंतर सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रातून मिळालेले प्रेम भारावून टाकणारे होते.’’ माझ्या घरचे एकटी राहते म्हणून नावे ठेवतात. सांगलीने दिलेला गोतावळा मला एकटेपणाची जाणीवच करून देत नसल्याचे सांगत त्यांनी अनेक आठवणींना मोकळी वाट करून दिली.
डॉ. अविनाश सप्रे म्हणाले, ‘‘विद्वान माणसांचे कधीच एकमत होत नाही. मात्र ताराबाईंचे नाव अध्यक्षपदासाठी येताच सर्वांनी त्यांना एकमुखाने संमती दिली. हा त्यांच्या विद्वत्तेचा विजय आहे. व्रतस्थ ज्ञाननिष्ठेतून आदर कमावला आहे. निवड झाल्यानंतरही कसलाही वाद न होता निर्विवादपणे त्यांना मिळालेले समर्थन त्यांचे मोठेपण दर्शवते.’’ मानद सचिव सुरेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अनिल मडके, सुदर्शन पाटील, जयश्री पाटील, राजगोंडा पाटील, शांतिनाथ कांते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
नाटकात काम... आक्षेप अन् पाठबळभवाळकर म्हणाल्या, ‘‘सांगली ही नाट्यपंढरी. मलाही नाटकाचे प्रचंड वेड. त्या वेडापायी ‘अमॅच्युअर ड्रामॅटिक असोसिएशन’ स्थापन करुन नाट्य चळवळ सुरू केली. दिग्दर्शन, अभिनयासह सर्वांगाने नाटक जगले. राज्य स्पर्धेत रौप्यपदक मिळाल्यानंतर हे वेड सोडून दिले. कारण नव्या पिढीला संधी मिळावी हा उद्देश होता.’’ त्या काळी महिलांनी नाटकात काम करणे ही दुर्मिळ गोष्ट असल्याने मी कार्यरत असणाऱ्या संस्थेत यावर आक्षेप घेतला गेला. नोकरीतून काढून टाकण्यापर्यंत चर्चा झाली. मात्र तत्कालीन संस्थाध्यक्ष डॉ. शिराळकर, खाडिलकर यांच्यासह बहुतांश जणांनी माझ्या पाठीशी राहण्याच्या निर्णयाने दिलासा मिळाल्याची आठवण त्यांनी सांगितली.