आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात टीम इंडियाची गाठ न्यूझीलंडविरुद्ध पडणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. न्यूझीलंड आणि टीम इंडिया दोन्ही संघांचा हा तिसरा आणि अंतिम सामना आहे. दोन्ही संघांनी सलग 2 सामने जिंकून उपांत्य फेरीत आधीच प्रवेश मिळवला आहे.त्यामुळे रविवारी 2 मार्चला होणारा सामना जिंकून ए ग्रुपमधून नंबर 1 होण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. तसेच उपांत्य फेरीच्या दृष्टीनेही हा सामना महत्त्वाचा असणार आहे.
दोन्ही संघांसाठी दुबईत होणारा सामना हा उपांत्य फेरीची रंगीत तालीम असणार आहे. तसेच ए ग्रुपमधील दोन्ही संघांचा उपांत्य फेरीत कोणत्या संघांविरुद्ध सामना होणार? हे भारत-न्यूझीलंड मॅचनंतर स्पष्ट होईल. त्यामुळे या सामन्याला उपांत्य फेरीच्या दृष्टीने फार महत्त्व प्राप्त झालं आहे.
दरम्यान टीम इंडियाला हा सामना जिंकून न्यूझीलंडच्या पराभवाच्या उधारीची परतफेड करण्याची नामी संधी आहे. दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आतापर्यंत फक्त एकदाच आमनेसामने आले आहेत. न्यूझीलंडने हा एकमेव सामना जिंकला आहे. त्यामुळे टीम इंडियाला रविवारी विजय मिळवून या पराभवाची परतफेड करण्याची सुवर्णसंधी आहे.
कोण होणार नंबर 1?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरुर्के, डॅरिल मिशेल, नॅथन स्मिथ, मार्क चॅपमन आणि जेकब डफी.