अरविंद रेणापूरकर - arvind.renapurkar@esakal.com
बदलत्या जीवनशैलीनुसार वाहन क्षेत्रातही आमूलाग्र बदल होत आहेत. चारचाकी वाहनांनी रस्ते व्यापून टाकले असले तरी दुचाकी वाहनांचे महत्त्वही नाकारता येत नाही. वाहतूक कोंडीतही तुम्हाला इच्छितस्थळी कमी वेळात आणि वेगात नेण्याचे काम दुचाकी करते; पण आता ग्राहकांच्या आणि चालकांच्या अपेक्षा वाढत आहेत. दुचाकी ही केवळ दैनंदिन कामापुरतीच मर्यादित न राहता साहसी प्रवासाचा अनुभव देणारीदेखील असावी, या मागणीतून ऑफ रोड मोटारसायकलची निर्मिती झाली. साहजिकच काळानुरूप, परिस्थितीनुरूप दुचाकी वाहनांच्या प्रकारात बदल झाला आहे. साहसी प्रवासाचा ट्रेंड वाढत असताना त्याला पूरक ठरणारी स्क्रॅम्बलर श्रेणीतील वाहन समोर आले. येजदी, डुकाटी, रॉयल एन्फिल्ड, ट्रायम्फ यांसारख्या कंपन्यांनी भारतीय रस्त्यांची स्थिती पाहत दमदार स्क्रॅम्बलर वाहने आणली. ही वाहने दुचाकी क्षेत्रात गेमचेंजर ठरत आहेत.
स्क्रॅम्बलर श्रेणीतील दुचाकी वाहने अन्य वाहनांच्या तुलनेत हटके असतात. अर्थातच सीसीनुसार प्रत्येक वाहनांची क्षमता वेगवेगळी असते आणि त्यानुसार त्याची वर्गवारी होते. बाइकची रचना आणि त्याचा आराखडा तयार करताना त्याचा उद्देश लक्षात घेतला जातो. ॲडव्हेंचर, रेट्रो, कॅफे रेसर, टुरर, स्क्रॅम्बलर यांसारख्या श्रेणीचा उल्लेख करता येईल. स्क्रॅम्बलरचा विचार केला तर चांगल्या आणि कच्च्या अशा दोन्ही रस्त्यांसाठी या बाइकचा वापर केला जातो. त्याला ‘डर्ट’ बाइक असेही म्हटले जाते. कच्च्या रस्त्यांचा सामना करण्यासाठी आणि स्पोर्टी लूक देण्यासाठी स्कॅम्बलर बाइकला काही वैशिष्ट्ये जोडली जातात. कदाचित या वैशिष्ट्यामुळे स्क्रॅम्बलर बाइक स्पोर्टी दिसू शकते; मात्र तिचे स्पोक व्हील पाहून तिची स्क्रॅम्बलर श्रेणी कळून चुकते.
प्रामुख्याने ऑफ रोडसाठी तयार केली जाणारी स्क्रॅम्बलर बाइक हाताळताना खूप जड वाटू नये, यादृष्टीने बांधणी केलेली असते; सस्पेंशन, ग्राउंड क्लिअरन्स हा अन्य वाहनांच्या तुलनेने अधिक असतो. स्क्रॅम्बलर मॉडेलचे मागचे टायर साधारणपणे १८ इंची तर आणि पुढचे टायर २१ इंची असते. स्क्रॅम्बलर बाइकमधील सुटे भाग अन्य बाइकमध्ये असतीलच असे नाही. कारण कच्च्या रस्त्यावरून जाताना दगड उडण्याची शक्यता असते आणि शिवाय खड्डेदेखील असतात. अशावेळी गाडीची सुरक्षितता राखली जावी, यासाठी काही अवांतर फीचर्स जोडलेले असतात. शिवाय ड्युअल रिअर शॉक्स, स्क्वेअर ब्लॉक्ड टायरसह स्पोक व्हील, सिंगल किंवा ट्विन सिलिंडर एअर कुल्ड इंजिन, हाय माउंटेड एक्झॉस्ट पाइप आणि लहान हेडलाइट यासारखे सुटे भाग स्क्रॅम्बलरला आकर्षक करतात. या ठिकाणी काही निवडक स्क्रॅम्बलर बाइकची माहिती घेता येईल.
दुचाकी वाहनांची विक्री वाढता वाढे२०२४ आर्थिक वर्षात भारतात दुचाकी वाहनांची विक्री ही मागील वर्षाच्या (२०२३) तुलनेत एक कोटी ८० लाखांनी वाढली आहे; पण २०१९ मध्ये दुचाकी वाहनांच्या विक्रीने विक्रम नोंदविला होता आणि त्यावेळी दोन कोटी १० लाख वाहनांची विक्रीची नोंद झाली होती. हा आकडा २०११च्या तुलनेत दुप्पट आहे. त्यावेळी एक कोटी १७ लाख दुचाकी वाहनांची विक्रीची नोंद झाली होती. २०२३ मध्ये प्रवासी वाहनांच्या खालोखाल दुचाकी वाहनांची विक्री झाली. दुचाकी श्रेणीत मोपेड, मोटारसायकल, स्कूटर्सचे प्रकार मोडतात. विशेष म्हणजे २०२३ मध्ये हीरो मोटोकॉर्पच्या दुचाकी वाहनांची सर्वाधिक विक्रीची नोंद झाली आहे.
ट्रायम्फ स्क्रॅम्बलर ४०० एक्स३९८.१५ सीसीचे लिक्विड कुल्ड सिंगल इंजिन
८००० आरपीएमवर ३९.५ बीएचपीची ऊर्जा
६५०० आरपीएमवर ३७.५ एनएमचा टॉर्क जनरेट
सहा स्पीड गिअरबॉक्स
वैशिष्ट्ये...
बाइकमध्ये ४३ एमएमच्या मोठ्या पिस्टनचे यूएसडी फोर्क्स आणि गॅस चार्ज्ड मोनोशॉर्क्स आहेत. त्याचवेळी समोर १९ इंच आणि मागच्या बाजूला १७ इंचाचे व्हील आहे. शिवाय पुढील बाजूला ३२० एमएमचे डिस्क आणि मागे २३० एमएमचे डिस्क ब्रेक आहे.
येजदी स्क्रॅम्बलर३३४ सीसीचे सिंगल सिलिंडर
फोर स्ट्रोक, लिक्विड कुल्ड डीओएचसी इंजिन
२९.७७ पीएसची कमाल ऊर्जा आणि २८.२० एनएमचा टॉर्क तयार होतो.
सहा स्पीड गिअरबॉक्स
व्हीलबेस १४०३ एमएम आणि आसनाची उंची ८०० मिलीमीटर
१८२ किलो वजन
वैशिष्ट्ये
येजदी स्क्रॅम्बलरमध्ये फ्लोटिंग कॅलिपर्ससह ३२० मिलीमीटरचे डिस्क ब्रेक असून मागे २४० मिलीमीटरचा डिस्क ब्रेक आहे. सुरक्षेसाठी पुढे आणि मागे एबीएस फीचर आहे. पुढील भागात टेलिस्कोपिक फोर्कससह क्वाईल स्प्रिंग दिले आहे.
हीरो मोटोकॉर्प मॅव्हरिक ४४०४४० सिंगल सिलिंडर एअरकुल्ड इंजिन
२७ बीएचपीची ऊर्जा आणि ३८ एनएमचा टॉर्क जनरेट होतो.
टीएफटी स्क्रीन, ब्लूटुथ कनेक्टिव्हिटी
टर्न बाय टर्न नेव्हिगेशन
वाइड हँडलबार, मस्कुलर फ्युएल टँक, राउंड हेडलँम्प
वैशिष्ट्ये
टेक्नॉलॉजी आणि परफॉर्मन्सचे अनोखे मिश्रण म्हणून हीरो मॅव्हरिक ४४० कडे पाहिले जाते. वाजवी किमतीतील बाइकमध्ये सहा स्पीड ट्रान्समिशन असून विंडस्क्रीन, फोर्क गेर्ट्स, फ्लॅटर सीट यासारखे फीचर्स आहेत.
डुकाटी स्क्रॅम्बलर ८००८०३ सीसीचे एअरकुल्ड, ट्विन इंजिन
७१ बीएचपी ऊर्जा तयार करण्यास सक्षम
सहा स्पीड गिअरबॉक्स
वैशिष्ट्ये
डुकाटी स्क्रॅम्बलरमध्ये रेन आणि स्पोर्ट्स मोड दिले असून यात कॉर्नरिंग एबीएस आणि बाय डायरेक्शनल क्विक शिफ्टरदेखील उपलब्ध आहे. डुकाटीच्या स्क्रम्बलर मॉडेलमध्ये १३ ते १५ लिटर क्षमतेची पेट्रोल टाकी उपलब्ध असून वाहनाचे वजनही १८० ते २०५ किलोच्या आसपास आहे. सर्वात महाग मॉडेल डुकाटी ‘स्क्रॅम्बलर ११००’ असून त्यात १०७९ सीसी इंजिन असून ८४.४८ बीएचपी पॉवर जनरेट करते.
रॉयल एन्फिल्ड स्क्रॅम ४४०आकर्षक डिझाइन, नवीन हेडलाइट आणि नवीन इन्स्ट्रुमेंट कन्सोलयुक्त.
४४३ सीसी एअर आणि ऑइल कुल्ड सिंगल सिलिंडर इंजिन.
२५.४ पीएसची ऊर्जा आणि ३४ एनएमचा टॉर्क जनरेट होतो.
सहा स्पीड ट्रान्समिशन, नवीन एलईडी हेडलाइट.
वैशिष्ट्ये...
रॉयल एन्फिल्ड ४४०चा लूक शानदार आहे. चालविण्यासाठी सुलभता राहावी यासाठी आसनव्यवस्था थोडी उंचीवर आहे. बाइकमध्ये १९/१७ अलॉय व्हील्स. २०० एमएमचा ग्राउंड क्लिअरन्स असून ऑफरोडिंगसाठी स्क्रॅम दमदार मानली जाते.
स्क्रॅम्बलरचे वेगळेपणस्क्रॅम्बलर मोटारसायकलचे काही वैशिष्ट्ये अन्य बाइकच्या तुलनेत वेगळेपण सिद्ध करणारे आहेत. यात ग्राउंड क्लिअरन्स, एक्झॉस्ट पाइप, स्पोक व्हील्स आदींचा उल्लेख करू. साहसी प्रवासासाठी स्क्रॅम्बलर बाइकमध्ये हार्ड सस्पेंशन दिले जाते.
तुम्हाला आव्हानात्मक, खडतर रस्त्यावरून जायचे असेल तर त्यासाठी ९०० सीसी किंवा १२०० सीसीसारख्या मोठ्या इंजिन क्षमतेचे दुचाकी असणे आवश्यक आहे. ही गरज स्क्रॅम्बलर श्रेणीतील बाइक भागवते.
स्क्रॅम्बलर खरेदी करताना....इंजिन आणि ऊर्जा : स्क्रॅम्बलर श्रेणीतील वाहने विविध इंजिन क्षमतेसह उपलब्ध आहेत. येजदी स्क्रॅम्बलर आणि रॉयल एन्फिल्ड स्क्रॅम ४०० सारख्या मॉडेलपासून डुकाटीपर्यंतचे स्क्रॅम्बलरसारखे शक्तिशाली पर्याय दिसून येतात. याप्रमाणे तुम्हीही प्राधान्यक्रमानुसार गाडीची श्रेणी निवडू शकता. चांगली इंजिन क्षमता आणि पॉवर आउटपूटचे आकलन करत बाइक घेता येईल.
दर्जा आणि विश्वसनीयता: स्क्रॅम्बलर खरेदी करताना त्याचा दर्जा, विश्वसनीयतेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. इंजिन गार्ड, प्रोटेक्टर, अपस्वेप्ट एक्झॉस्ट कॅन कंपोनंट्सचा विचार व्हायला हवा.या फीचर्सकडे लक्ष दिल्यास अनेक वर्षे विनाअडथळा स्क्रॅम्बलरवरून बिनदिक्कत प्रवास करू शकता.
एकूणातच स्क्रॅम्बलर श्रेणीतील वाहन अलीकडच्या काळात भारतीय बाजारपेठेत वेगळेपण जपणारे म्हणून नावारूपास आले आहे. ऑफ रोड आणि ऑन रोड यातील फरक कमी करणाऱ्या स्क्रॅम्बलरने कमी कालावधीत लोकप्रियता मिळवली आहे. ऑफरोडसाठी हवा असणारा दणकटपणा आणि ऑनरोडसाठी असणारा आकर्षकपणा याचा अनोखा संगम स्क्रॅम्बलर श्रेणीतील वाहनांत दिसतो. म्हणूनच तरुण पिढी स्क्रॅम्बलर वाहनांना झुकते माप देत असल्याने वाहन कंपन्यांही एकाहून एक सरस वाहने आणण्याची तयारी करत आहेत.