'आपल्या घटका भरल्या. आता कोणीही वाचवू शकणार नाही आपल्याला,' डोळे बंद करून घेत निशाचर उन्नी उदासपणे म्हणाला. 'देव वाचवेल!' उन्नीच्या शेजारी उडी मारून खाली येत अली म्हणाला.
वडाच्या चाळीतली ती सकाळ नेहमीसारखी नव्हती. उन्नीचे म्हणजे निशाचर घुबडाचे डोळे, तर सकाळ असूनही सताड उघडे होते. त्याच्या डोळ्यांना दूरवर काहीतरी दिसत होतं. राक्षस! यांत्रिक राक्षस! धातूचे अणकुचीदार दात असणारे, आपली मुळं उपटणारे, आपली घरं उद्ध्वस्त करणारे यांत्रिक राक्षस! वडाच्या चाळीत भीतीची लाट पसरली, तेवढ्यात एक भयानक मिशीवाला माणूस झाडाभोवती फेरी मारताना आणि बुंध्याचं माप घेताना त्यांना दिसला - श्रीयुत मिशीवाला!
उन्नीला वाटलं आता संपलं सगळं, तेवढ्यात अली वानर म्हणाला 'आपल्याला देव वाचवेल.' देव? उन्नीला प्रश्न पडला. त्यावर अलीने एक गोष्ट सांगितली.
अलीचे अब्बू म्हणजे एक मदारीचे नाचणारे वानर होते. पत्र्याचं छप्पर असलेल्या ज्या झोपडीत ते मालकासोबत राहत होते, त्या झोपड्या तोडायला एक राक्षस आला, तेव्हा त्या मालकाने दिवसभर देवाची प्रार्थना केली. नंतर म्हणे त्या राक्षसांनी झोपड्यांना काही सुद्धा केलं नाही आणि म्हणून अलीने ठरवलं की, आता तोसुद्धा देवळात जाऊन प्रार्थना करणार आहे.
त्यावर गिल्लर्री नावाच्या खारुताईला आणि फरफर्यू नावाच्या पोपटाला शंका आली की, माणसांचा देव आपली मदत का करेल? करेल का? प्रश्न तर अगदी बरोबर होता त्यांचा, पण अली म्हणाला 'आपण प्रयत्न तर करूया' आणि निघाला देवळाकडे जायला.
देवळातून येणाऱ्या घंटेच्या आवाजाच्या दिशेने अली उड्या मारत निघाला! या झाडावरून त्या झाडावर, या छपरावरून त्या छपरावर, या रस्त्यावरून त्या रस्त्यावर! देवळाजवळ गेल्यावर ‘जय बजरंगबली! जय बजरंगबली!’ असं डोळे मिटून, हात जोडून, जोरजोरात म्हणत असलेला श्रीयुत मिशीवाला अलीला दिसला!
बापरे! हा भयंकर माणूस ज्याची प्रार्थना करतो तो देव सर्वांत शक्तिशाली असला पाहिजे असा विचार करून अली त्या देवाच्या मूर्तीकडे वळला आणि मूर्ती पाहता क्षणी तो जागच्या जागी खिळून गेला! खिळणारच कारण ज्या ‘बजरंगबली’चं नाव श्रीयुत मिशीवाला घेत होता तो देव म्हणजे एक वानर होता! अगदी अलीसारखाच!
सगळे लोक निघून गेल्यावर अलीने बजरंगबलीला नीट न्याहाळलं. खालून वर-वरून खाली! मग अलीने आपली छाती फुगवली, शेपटी ताठर केली आणि आपलं बूड उचललं. स्वतःला ‘वानरदेव’ म्हणून मनातल्या मनात त्याने घोषित केलं आणि तेवढ्यात त्याच्या डोक्यात एक कल्पना चमकली!
त्याने लगोलग बजरंगबलीकडे वळून, हात जोडून, डोळे मिटून, श्रीयुत मिशीवालासारखं ‘जय बजरंगबली’ म्हटलं आणि घंटा वाजली- घण! बजरंगबलीच्या शुभेच्छा घेऊन अली त्याच्या योजना पूर्ण करण्याच्या कामी लागला. हा प्लॅन फत्ते होण्यासाठी त्याला हव्या होत्या फक्त दोन गोष्टी आणि त्यासाठी त्याला फार लांब जाण्याचीही जरूर नव्हती.
अली वडाच्या चाळीच्या मागच्या मैदानावर, जिथे रामलीलेलाचा प्रयोग होणार होता, तिथे जाऊन पोहोचला. अनेक कलाकार त्याला आजूबाजूला दिसले, पण त्यांच्याकडून त्या गोष्टी मिळवायच्या कशा असा विचार करत असतानाच अलीला एक दहा तोंडांचा माणूस ढाराढूर झोपलेला दिसला. त्या माणसाच्या बाजूला होती एक गदा आणि दहा डोक्यांपैकी एका डोक्यावर जरा सरकलेला मुकूट.
इकडे ऑफिसमध्ये श्रीयुत मिशीवाला अतिशय गांभीर्याने दुसऱ्या दिवशीच्या कामाच्या सूचना देत होता. उद्याच्या उद्या हे झाड तोडलं गेलंच पाहिजे हे त्याच्या इंजिनिअरला सांगत असतानाच त्याने वर पाहिलं आणि “बजरंगबली!” भीती आणि आश्चर्याने त्याच्या तोंडून निघालं. गोंधळून गेलेल्या त्याच्या ऑफिसमधल्या लोकांना त्याने खिडकीच्या दिशेने बघायला सांगितलं, पण त्यांना कोणीच दिसलं नाही. श्रीयुत मिशीवाला धावत बाहेर येऊन पाहतो तर कोणीच नाही. ‘आपल्याला भास झाला की खरंच...?’ श्रीयुत मिशीवाला घाबरला.
त्या दिवशी संध्याकाळी वडाच्या चाळीला भेट देऊन श्रीयुत मिशीवाला परत जायला निघणार तेवढ्यात वडाच्या फांद्या हळू लागल्या, पानं सळसळू लागली आणि पानांतून काहीतरी चमकलं. काय आश्चर्य! श्रीयुत मिशीवाला गुडघ्यावर बसला, त्याने हात जोडले आणि मस्तक खाली झुकवलं. हो कारण त्याला त्याचा बजरंगबली - म्हणजे गदा हातात घेतलेला आणि मुकुट डोक्यावर घातलेला आपला अली- झाडाच्या सगळ्यात उंच फांदीवर उभा असलेला दिसला!
अली, श्रीयुत मिशीवाला, उन्नी आणि वडाच्या चाळीतले इतर रहिवासी- जिलबी, गिल्लर्री, सिल्लरू, डुबके आणि चुपके, अंगुरी, फरफर्यू, चुप्पी आणि चटरपटर यांच्यासोबतच या गोष्टीतलं एक महत्त्वाचं पात्रं म्हणजे श्रीयुत मिशीवाला यांच्या भरगच्च मोठ्या मिश्या- चिडताना तडतडणाऱ्या, घाबरल्यावर ओशाळणाऱ्या!
या सगळ्यांची सुंदर, बारकाव्यांसकट काढलेली रेखाटने प्रिया कुरियन यांची आहेत. झाडावरची दुनिया आणि हे झाड ज्या शहरात आहे ते शहर या दोन्ही गोष्टी सुंदर चित्रातून आपल्याला भेटतात. ही गोष्ट लिहिली आहे देवाशिष मखीजा यांनी आणि याचा मराठी अनुवाद सुनिती जैन यांनी केला आहे. तुलिका प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.
वडाच्या झाडावर बजरंगबलीला पाहिल्यावर श्रीयुत मिशीवाला गाढ झोपू शकला नाही. अस्वस्थपणे चुळबुळत राहिला. शेवटी कशी बशी झोप लागली, तेव्हा त्याला स्वप्न पडलं. खुद्द भगवान बजरंगबली आले होते त्याला भेटायला! 'वडाचा नाद सोड.
नाहीतर मी तुझ्या मिशांना आग लावीन, जशी मी लंकेला लावली होती!' अशी ताकीद देऊन बजरंगबली निघून गेले. दुसऱ्या दिवशी श्रीयुत मिशीवालाने ताबडतोब रस्ता बनवण्याची आणि त्यासाठी वडाचं झाड तोडण्याची योजना रद्द करून टाकली!
गोपूचा कोलकात्यातलं फिरणं, जामलोचा खडतर प्रवास आपण पाहिलाच. आज अलीचा प्रवास! साध्या वानरापासून- बजरंगबली बनण्याचा! एखादी गोष्ट शास्त्रशुद्ध पद्धतीने समजावून सांगून, एखाद्या कृतीमागचा वैज्ञानिक कार्यकारणभाव समजावून सांगून किंवा माणसांमधल्या निव्वळ चांगुलपणाला आवाहन करून जो परिणाम साध्य होत नाही, तो भीती दाखवून - विशेषतः देवाची, पाप घडण्याची भीती दाखवून कसा लगेच साध्य होतो हे अलीला नीटच कळलं होतं! आणि माणसाच्या याच स्वभावगुणाचा उपयोग त्याने आपली चाळ वाचवण्याकरता केला होता! हुशार अली!
पुन्हा एकदा सकाळ होती! ही सकाळ मात्र आनंदी आणि प्रसन्न होती कारण राक्षस निघाले होते परत जायला. वडाचं झाड आणि झाडावरची चाळ आता सुरक्षित होती. श्रीयुत मिशीवाला झाडाजवळ आला आणि त्याने बजरंगबलीची माफी मागून त्याच्यासाठी केळ्यांचा घड नैवेद्य म्हणून ठेवला. बजरंगबली- म्हणजे आपला अली हो, फांदीवर बसला होता. त्याने हात उंचावून श्रीयुत मिशीवालाला आशीर्वाद दिला आणि एक केळं तोंडात कोंबता कोंबता अली म्हणाला, 'जय बजरंगबली!'