Swargate Rape Case : जबाब नोंदवला, गाडेची होणार 'डीएनए' चाचणी
esakal March 02, 2025 08:45 AM

पुणे - स्वारगेट बस स्थानकातील लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी दत्तात्रेय गाडे याचा आज पोलिसांनी जबाब नोंदविला, तसेच त्याची ससून रुग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आता गाडेची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.

स्थानकाच्या आवारात असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना मंगळवारी (ता. २५) घडली. आरोपी गाडेने तरुणीकडे वाहक असल्याची बतावणी करत तिला शिवशाही बसमध्ये नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला.

तरुणीवर अत्याचार करुन पसार झालेल्या गाडे याला शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. गाडेला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पोलिस कोठडीत असलेल्या गाडेचा जबाब शनिवारी पोलिसांकडून नोंदविण्यात आला, अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.

स्वारगेट आगारात थांबलेल्या तरुणीला ‘ताई’ म्हणत आरोपीने शिवशाही बसमध्ये नेऊन गळा दाबून अत्याचार केला. त्यानंतर ‘दादा मला घरी जाऊ द्या,’ अशी विनवणी तरुणी करत असतानाही आरोपीने तिला मारहाण करून दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केला, असे फिर्यादित नमूद आहे.

रक्त आणि केसांची देखील होणार तपासणी -

गाडे याला अटक करण्यात आल्यानंतर त्याला पुण्यात आणण्यात आले. ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी तसेच लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली. लैंगिक क्षमता चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. त्यानंतर आता गाडेची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. रक्त आणि केसांचे नमुने डीएनए चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

बसची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी -

ज्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला त्या बसची न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी पाहणी केली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, बस न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.