IND vs NZ, Video: शमी थोडक्यात वाचला, नाहीतर भारताला बसला असता मोठा धक्का! न्यूझीलंडच्या कर्णधारामुळे झाला असता जखमी
esakal March 03, 2025 01:45 AM

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना खेळवला जात आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर २५० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, या सामन्यात भारताला मोठा धक्का बसला असता, पण थोडक्यात निभावलं म्हणून मोहम्मद शमी जखमी होता होता राहिला.

या सामन्यात भारताने शुभमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या पहिल्या तीन विकेट्स ३० धावांतच गमावल्या होत्या. पण नंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी ९८ धावांची भागीदारी करत डाव सावरला. अक्षर ४२ धावांवर बाद झाला.

पण नंतर श्रेयसने केएल राहुलच्या साथीने डाव पुढे नेला. परंतु, श्रेयसही ७९ धावांवर बाद झाला. पाठोपाठ केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्याही विकेट्स स्वस्तात गमावल्या. तरी हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकांमध्ये आक्रमण केले होते. मात्र, त्यालाही ४५ धावांवर मॅट हेन्रीने ५० व्या षटकात बाद केले.

५० व्या षटकात हार्दिक बाद झाल्यानंतर आणि कुलदीप यादव फलंदाजी करत होते. या षटकाच्या ५ व्या चेंडूवर शमी आणि कुलदीप दोन धावा पळत होते.

त्यावेळी डीपला क्षेत्ररक्षण करणाऱ्या न्यूझीलंडच्या कर्णधार मिचेल सँटेनरने चेंडू पकडून स्ट्रायकरच्या दिशेने धावबाद होईल, या अपेक्षेने जोरात थ्रो केला. पण तो चेंडू चुकून शमीच्या उजव्या खांद्याजवळ जोरात लागला.

तो चेंडू शमीच्या पाठीवर इतका जोरात आदळला की शमीला काही क्षण वेदना जाणवल्या. त्यामुळे भारताची मेडिकल टीमही मैदानात आली. शमी उजव्या हाताने गोलंदाजी करत असल्याने काही क्षण भारतीय चाहत्यांचे ठोक चुकले होते. पण नंतर शमी फिट असल्याचे दिसून आले. तो पुढचा चेंडू खेळला, पण ग्लेन फिलिप्सने झेल घेत त्याला ५ धावांवर बाद केले.

शमी बाद होण्यासोबतच ५० षटकेही संपली. भारताने ५० षटकात ९ बाद २४९ धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने ५ विकेट्स पूर्ण केल्या. तसेच काईल जेमिसन, विल्यम ओ'रुर्की, मिचेल सँटेनर आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.