योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी
जुन्या वादातून एका तरुणाला आणि त्याच्या वयस्कर आईला जबर मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी तरुण आणि त्याच्या आईचे अपहरण केले आणि त्यानंतर त्यांना मारहाण केली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर येथील घाटशील पारवगाव येथे जुन्या वादातून तरुण आणि त्याच्या आईला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. सुरुवातीला दोघांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर मारहाण केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. मारहाणीमुळे तरुणाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचे पाहायला मिळते. या तरुणाचे नाव कृष्णा दादासाहेब घोडके असे म्हटले जात आहे.
हा प्रकार झाल्यानंतर २४ तासांनी बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यामध्ये कृष्णा दादासाहेब घोडके याच्या तक्रारीवरुन ६ आरोपींच्या विरोधात कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले आहे अशी माहिती शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश ढोक्रड यांनी दिली आहे.
आरोपींचा फिर्यादी तरुण आणि त्याच्या आईसोबत जुना वाद होता. त्या वादातून आरोपीने मायलेकाचे अपहरण केले. त्यांना अज्ञात स्थळी नेऊन जबर मारहाण केली. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करुन आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.