भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच रविवारी (२ मार्च) ४४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघ अ गटात अव्वल क्रमांकावर राहिला आहे. तसेच अपराजित असून आता उपांत्य सामन्यात ब गटातील ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.
रविवारी दुबईत झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात वरुण चक्रवर्ती भारताच्या विजयाचा स्टार ठरला. त्याने या सामन्यात ५ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडकडून केन विलियम्सनने चांगली झुंज दिली. पण त्याला बाकी कोणी साथ दिली नाही.
या सामन्यात न्यूझीलंडसमोर २५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला ४५.३ षटकात सर्वबाद २०५ धावाच करता आल्या.
न्यूझीलंडकडून विल यंग आणि रचिन रवींद्र सलामीला फलंदाजीला उतरले होते. पण रचिनला चौथ्याच षटकात हार्दिक पांड्याने ६ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर विल यंगला १२ व्या षटकात २२ धावांवर त्रिफळाचीत केले. यानंतर न्यूझीलंडची धावगती मंदावली. त्यातच डॅरिल मिचेलला कुलदीप यादवने १७ धावांवर पायचीत करत न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला.
त्यापाठोपाठ टॉम लॅथमही १४ धावांवर रवींद्र जडेजाविरुद्ध खेळताना पायचीत झाला. तरी एक बाजू केन विलियम्सन सांभाळत होता. मात्र, दुसऱ्या बाजूने ग्लेन फिलिप्स (१२) आणि मायकल ब्रेसवेलही (२) झटपट बाद झाले. त्यांना चक्रवर्तीनेच पायचीत केले.
अखेर ४१ व्या षटकात केन विलियम्सनला अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर केएल राहुलने यष्टीचीत केले. विलियम्सनने १२० चेंडूत ८१ धावा केल्या. विलियम्सन बाद झाल्यानंतरही कर्णधार मिचेल सँटेनरने आक्रमक खेळ केला होता. पण त्याला ४५ व्या षटकात वरुण चक्रवर्तीने त्रिफळाचीत केले. त्याच षटकात चक्रवर्तीने मॅट हेन्रीला २ धावांवर बाद करत ५ विकेट्स पूर्ण केल्या.
पुढच्या षटकात कुलदीप यादवने विल्यम ओ'रुर्कीला १ धावेवर त्रिफळाचीत केले आणि न्यूझीलंडचा डाव संपवला.
भारताकडून वरुण चर्कवर्तीने १० षटकात ४२ धावा खर्च करत ५ विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पुर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने ३० धावांतच ३ विकेट्स झटपट गमावल्या होत्या. पण श्रेयस अय्यरने ७९ धावांची खेळी केली. त्याने अक्षर पटेलसोबत ९८ धावांची भागीदारी केली. अक्षरनेही ४२ धावा केल्या. शेवटी हार्दिक पांड्याने ४५ धावा चोपल्या. त्यामुळे भारताने ५० षटकात ९ बाद २४९ धावा केल्या.
न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने ५ विकेट्स घेतल्या. काईल जेमिसन, विल्यम ओ'रुर्की, मिचेल सँटेनर आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.